पाण्यामुळे शेतीवर संकट

पाण्यामुळे शेतीवर संकट

Published on

पाण्यामुळे शेतीवर संकट
वांद्री धरणाची कालवा दुरुस्ती निकृष्ट दर्जाची
मनोर, ता. २५ ः वांद्री धरणाच्या डाव्या, उजव्या कालव्यांवरील पाणीगळती रोखण्यासाठी १०४ मोऱ्या दुरुस्त केल्या जाणार आहेत, पण फुटलेल्या सिमेंट पाइपवर काँक्रीट टाकण्यात येत असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पालघर तालुक्यातील गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीत वांद्री धरणातील पाणी पंचक्रोशीतील गावांमधील शेतीच्या सिंचनासाठी सोडले जाते. डाव्या आणि उजव्या कालव्यांमार्फत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे दोन हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते. खरीप हंगाम पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे डिसेंबर अखेरीस सुरू होणाऱ्या सिंचन हंगामासाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर भातपिकाची लागवड केली जाते. सूर्या प्रकल्पा अंतर्गत ऐंशीच्या दशकात वांद्री नदीवर मातीचे बांधकाम असलेले ३५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेले वांद्री धरण बांधले होते. याच कालावधीत उजव्या कालव्यामार्फत धरणापासून पारगाव सोनावेपर्यंत, तर डावा कालव्यातून हालोली गावाच्या पाडोस पाड्यापर्यंत धरणाचे पाणी पोहोचवण्यात आले होते.
--------------------
पाणीगळतीमुळे हतबल
पाणीगळतीमुळे दोन्ही कालव्यांच्या शेवटच्या टोकांवर गावांच्या हद्दीत धरणाचे पाणी पोहोचण्यास अडथळे येत होते. कालव्यांमधून होणाऱ्या पाणीगळतीमुळे सिंचन क्षेत्र घटले होते. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर झाला होता. त्यामुळे रब्बी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची वेळ पाटबंधारे विभागावर ओढावली होती. कालव्यांमधून होणारी पाणीगळती रोखण्यात पाटबंधारे विभाग हतबल होता.
---------------------------------
तीन कोटींचा खर्च
- पाटबंधारे विभागाकडून वांद्री धरणाच्या दोन्ही कालव्यांची दुरुस्तीची कामे प्रास्तावित करण्यात आली होती. उजव्या, डाव्या कालव्यावरील १०४ ठिकाणच्या मोऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी तीन कोटी १८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
- दुरुस्तीच्या कामाअंतर्गत खोदकाम करून कालव्यांच्या खालून जाणाऱ्या मोऱ्यांचे सिमेंट पाइप मोकळे केले जात आहेत. मोऱ्यांमधील पाइपवर सिमेंट काँक्रीटचे आवरण टाकले जात आहे. अधिक नुकसान झालेले सिमेंट पाइप बदलले जात असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे.
--------------------------------
भगदाड पडलेले तसेच गाळाने भरलेल्या सिमेंट पाइपवर काँक्रीट ओतल्यामुळे हालोली गावाच्या हद्दीतील दुरुस्तीचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले होते. त्यामुळे ठेकेदाराला पाइप बदलण्याचे निर्देश दिले आहेत.
ः- नीलकमल गवई, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com