ठाकरे गटाचे चार नगरसेवक नॉट-रिचेबल

ठाकरे गटाचे चार नगरसेवक नॉट-रिचेबल

Published on

नगरसेवकांच्या शोधासाठी फलकबाजी
कल्याणमध्ये ठाकरे गटाचे चौघे नॉट रिचेबल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवलेले ठाकरे गटाचे ११ पैकी चार नगरसेवक गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असल्याने शहरात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पोलिसांकडून शोध लागत नसल्याने, आता ठाकरे गटाने कल्याण पूर्वेत चक्क ‘नगरसेवक बेपत्ता’ असल्याचे पोस्टर लावून अनोखे आंदोलन सुरू केले आहे.

१६ तारखेपासून संपर्क तुटलेल्या नगरसेवकांमध्ये मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट, स्वप्नील केणे या नावांचा समावेश आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘पोस्टर’द्वारे शोध घेण्याचा इशारा दिला होता. त्या इशाऱ्यानंतर आज कल्याण पूर्वेतील महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि रस्त्यांवर हे पोस्टर झळकू लागले आहे. या पोस्टरवर संबंधित नगरसेवकांचे फोटो असून, कुणाला आढळल्यास जवळच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात यापूर्वीच लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा माहिती मिळत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या नगरसेवकांचे अपहरण झाले आहे की त्यांना जाणीवपूर्वक अज्ञातस्थळी ठेवण्यात आले आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कुटुंबीयांची चिंता वाढली
एकीकडे राजकीय संघर्ष तीव्र झाला असताना, दुसरीकडे बेपत्ता नगरसेवकांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी आपल्या माणसांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, अशी विनवणी कुटुंबीयांकडून केली जात आहे. महापालिकेत महापौर कोणाचा बसणार, याचे गणित या चार नगरसेवकांवर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे नगरसेवक महापौर निवडीपूर्वी ‘शिवसेना’ शाखेत परततात की थेट सभागृहात दिसतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com