पावसाळी पाण्यापासून मुक्तता
वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २५ : कळंबोली व पनवेल शहराला दरवर्षी पावसाळ्यात भेडसावणाऱ्या पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पनवेल महापालिकेने ठोस आणि व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पर्यावरण विभागाची आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर कळंबोली येथील जलधारण तलावांची सखोल स्वच्छता, गाळ काढणे, अत्याधुनिक पंपिंग स्टेशन उभारणी, तसेच गाढी नदीकाठ संरक्षणाची मोठी कामे एकाच वेळी राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमुळे अतिवृष्टीच्या काळात साचणारे पाणी वेगाने उपसले जाणार असून कळंबोलीसह पनवेल शहरातील पूरधोका लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. यासाठी पनवेल महापालिका सुमारे पावणेचारशे कोटी रुपये खर्च करणार आहे.
पनवेल महापालिकेच्या हद्दीतील कळंबोली येथील जलधारण तलावांमधील साचलेला गाळ काढून पाणी शुद्धीकरण प्रक्रियेसह सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. यासोबतच या तलाव परिसरात गेट पंप तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक पावसाळी पाणी उपसा पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या टप्प्यासाठी अंदाजे १२७ कोटी खर्च अपेक्षित असून, पावसाळ्यात साचणारे अतिरिक्त पाणी वेगाने उपसून नियोजित ठिकाणी वळवता येणार आहे. त्यामुळे कळंबोली वसाहतीत वारंवार निर्माण होणारी पुरसदृश परिस्थिती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
तसेच गाढी नदीच्या काठावर अंतर्गत दोन स्वतंत्र पावसाळी पाणी उपसा पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच नदीकाठाची धूप रोखण्यासाठी गॅबियन भिंत तसेच आरसीसी तंत्रज्ञानावर आधारित संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे २६२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, अतिवृष्टीच्या काळात नदीपात्रातील पाणीपातळी वाढल्याने होणारा पूर व संभाव्य नुकसान टाळण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे.
जनजीवन विस्कळीत
कळंबोली वसाहतीतील मार्बल मार्केटलगत तसेच सिंग सिटी हॉस्पिटलसमोर मोठा जलधारण तलाव असून परिसरातील पावसाचे पाणी येथे जमा होते. याच ठिकाणी पंपिंगद्वारे पाणी सोडण्यात येते. कळंबोलीचा जुना परिसर समुद्रसपाटीपेक्षा खाली असल्याने कमी पावसातही येथे पाणी साचते आणि जनजीवन विस्कळीत होते. २६ जुलै २०२५ च्या महापुरात कळंबोलीला सर्वाधिक फटका बसला होता.
गाळ साचल्याचा फटका
महापुराच्या काळात मोठ्या प्रमाणावर माती, झाडे-झुडपे, कचरा, वाहने तसेच घरगुती साहित्य जलधारण तलावात साचल्याने त्याची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता लक्षणीयरीत्या घटली आहे. परिणामी पावसाळ्यात तलाव ओव्हरफ्लो होऊन कळंबोली वसाहतीत पाणी शिरते. जलधारण तलावातही मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असून, ही समस्या दरवर्षी कळंबोलीकरांना भेडसावते.
कळंबोली व पनवेल परिसरातील पावसाळी पाणी व्यवस्थापन हा महापालिकेचा अत्यंत प्राधान्याचा विषय आहे. जलधारण तलावातील गाळ काढणे, अत्याधुनिक पंपिंग स्टेशन उभारणी व नदीकाठ संरक्षण या सर्व कामांमुळे पूरस्थितीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल पालिका
कळंबोली वसाहतीतील जलधारण तलावाची क्षमता कमी झाल्यामुळे दरवर्षी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आता गाळ काढणे व पंपिंग यंत्रणा उभी राहत असल्याने कळंबोलीला पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे.
- रामदास शेवाळे, नगरसेवक, कळंबोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

