चंद्रगड उर्फ ढवळगड किल्ला दुर्लक्षित!

चंद्रगड उर्फ ढवळगड किल्ला दुर्लक्षित!
Published on

चंद्रगड उर्फ ढवळगड किल्ला दुर्लक्षित!
पर्यटनाला चालना देण्यासाठी गडसंवर्धनाची गरज; गडप्रेमींची मागणी
पोलादपूर, ता. २५ (बातमीदार) : पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक चंद्रगड उर्फ ढवळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित होणार होता; मात्र ही घोषणा आजही कागदावरच राहिल्याने गड पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत आहे. राज्यातील अनेक गड-किल्ले व पर्यटनस्थळांचा पर्यटन विभागामार्फत विकास केला जात असताना पोलादपूर तालुक्यातील हा महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा मात्र विविध शासकीय योजनांपासून अलिप्त राहिला आहे. त्यामुळे चंद्रगडाचे संवर्धन करून पर्यटनाच्या नकाशावर आणावे, अशी जोरदार मागणी गडप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांकडून केली जात आहे.
इतर गडकिल्ल्यांवर जशा प्रदक्षिणा मोहिमा, ट्रेकिंग मार्ग, माहिती फलक आणि मूलभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवर चंद्रगडावरही प्रदक्षिणा मोहीम आखली गेल्यास या गडाचा इतिहास पुन्हा उजेडात येईल. शिवकालीन राजकारण, सैनिकी धोरण आणि सह्याद्रीतील भौगोलिक महत्त्व अभ्यासण्याची संधी यामुळे उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलादपूर तालुका हा ऐतिहासिकदृष्ट्या लढवय्या तालुका म्हणून ओळखला जातो. आजही या तालुक्यातील शेकडो तरुण देशसेवेत कार्यरत असून, अनेकांनी बलिदान दिले आहे. या तालुक्याचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच येथील भूगोलही वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाबळेश्वरच्या ऑर्थर सीटच्या टोकावरून विस्तीर्ण परिसर न्याहाळताना प्रतापगड, रायगड आणि तोरणा हे किल्ले स्पष्ट दिसतात. याच परिसरात ढवळी नदीच्या खोऱ्यात दबा धरून बसलेला चंद्रगड उर्फ ढवळगड आपले लक्ष वेधून घेतो.
..................
बदललेल्या नावाची कहाणी
इतिहासानुसार हा किल्ला पूर्वी जावळीच्या मोऱ्यांच्या अखत्यारीत होता. जावळीच्या मोऱ्यांना ‘चंद्रराव’ हा किताब होता. शिवाजी महाराजांनी मध्यस्थी करून येथील सत्तासंघर्ष मिटवला आणि यशवंतराव मोरे याला चंद्रराव बनवले. मात्र पुढे मोऱ्यांनी आदिलशाहीशी संगनमत करून स्वराज्याविरुद्ध भूमिका घेतल्याने १६५५-५६ मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला करून हा प्रदेश स्वराज्यात सामील केला. त्याच वेळी ढवळगडाचे नाव बदलून ‘चंद्रगड’ ठेवण्यात आले.
................
आजही चंद्रगडावरून रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारे दिसतात. ढवळ्याघाट, खिंड आणि ऑर्थर सीटचा थरारक नजारा अनुभवता येतो. मात्र, योग्य मार्गदर्शन, माहिती फलक, सुरक्षित वाटा आणि संवर्धनाच्या अभावामुळे हा किल्ला अजूनही सर्वसामान्य पर्यटकांपासून दूर आहे. त्यामुळे शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेऊन चंद्रगडाचे संवर्धन व विकास करणे काळाची गरज बनली आहे, असे मत गडप्रेमींनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com