उपवन महोत्सवात रंगणार वारी
उपवन महोत्सवात रंगणार वारी
६ फेब्रुवारीपासून कला-सांस्कृतिक मेजवानी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता २५ : ठाणे महापालिका निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेल्या उपवन आर्ट फेस्टिवलची प्रतीक्षा आता संपली आहे. उपवन तलाव परिसरात ६ ते ९ फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव वारी या संकल्पनेवर रंगणार आहे. विहंग संस्कृती कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या महोत्सवात ठाणेकरांना चार दिवस कला, संगीत, नृत्य आणि लोकसंस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे.
उपवन तलाव जवळ १५ एकरच्या परिसरात हा महोत्सव भरणार आहे. यंदा या महोत्सवाचे अकरावे वर्ष असून महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर परेड काढण्यात येणार असून, सलामी स्टेजवर उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या महोत्सवात पाच विशेष संकल्पनात्मक मंचांवर देश-विदेशातील ६०० हून अधिक कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत, गझल, लोककला, नृत्य, कवीसंमेलन अशा विविध कलाप्रकारांचा समावेश या महोत्सवात करण्यात आला आहे. उपवन तलावाजवळ पांडुरंगाची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. त्यामुळे वारी ही संकल्पना घेऊन यंदाचा कला सांस्कृतिक महोत्सव पार पडणार आहे.
...............
संगीत-भक्तीचा संगम
६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तरंग मंचावर पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व) यांची ‘आनंदवारी’ ही अभंग व भक्तिगीतांची मैफल रंगणार आहे. उस्ताद मीर मुख्तियार अली, जशन भुमकर, सांगिता शंकर व त्यांच्या कन्या, वेदांत जामगांवकर, रुचिका खोत यांची भक्तिसंध्याही होणार आहे. पं. अजय पोहनकर यांचा प्रभात रंग तर पं. संगीत मिश्रा व पं. संदीप मिश्रा यांचा रंग बनारस हा सरंगी जुगलबंदीचा कार्यक्रमही रसिकांसाठी आकर्षण ठरणार आहे. अवंती पटेल व ऋतुजा लाड यांचे गझल सादरीकरणही होणार आहे.
........................
विहंग मंचवरील विशेष कार्यक्रम
७ फेब्रुवारी रोजी गायक आनंद व आदर्श शिंदे यांचा शिंदेशाही कार्यक्रम होणार असून, ८ फेब्रुवारीला सदाबहार गायक शान यांचा संगीताचा जलसा रंगणार आहे. ९ फेब्रुवारीला कवी शैलेश लोढा यांच्या कवीसंमेलनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
.................
नृत्य, लोककला आणि आधुनिक प्रयोग
मुद्रा मंचावर देशातील नामवंत शास्त्रीय नृत्यकलावंतांचे सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच '' व्ही आर वन'' हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक विशेष प्रयोग सादर केला जाणार आहे. विरासत मंचावर भारतातील विविध प्रांतांतील लोककला तर बीट ट्रीट मंचावर फ्लॅश मॉब व लोकप्रिय बँडचे कार्यक्रम होणार आहेत.
...............
प्रदर्शन, कार्यशाळा आणि कुटुंबांसाठी आकर्षणे
महोत्सवात १०० हून अधिक स्टॉल्स असणार असून, त्यामध्ये कलात्मक वस्तू, खाद्यपदार्थ, लाईव्ह लायब्ररी, कला दालने, छायाचित्र प्रदर्शन, रांगोळी, हस्तकला व पारंपरिक कारागिरीचे दर्शन घडणार आहे. ब्लॉक प्रिंटिंग, मातीची भांडी सजावट अशा कार्यशाळाही होणार आहेत. मुलांसाठी फन झोन, मेणाचे पुतळे संग्रहालय, लाईट व लेझर शो तसेच म्युझिकल फाउंटन हे विशेष आकर्षण ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

