राडारोडा टाकणाऱ्या डंपर चालकांना दणका
नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : उरणमधील चिर्ले भागातील सिडकोच्या मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे राडारोडा टाकण्यासाठी आलेले सात डम्पर पकडण्याची कारवाई सिडकोच्या पथकाने बुधवारी (ता. २१) सायंकाळी केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सात डम्परचालकावर उरण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून सर्व वाहने जप्त करण्यात आली आहेत.
उरण परिसरातील चिर्ले भागातील हॉटेल गंगा रसोई या हॉटेलसमोरील रोडच्या बाजूला मानवी आरोग्यास धोकादायक असलेले माती आणि रॅबिट असलेले डेब्रीज टाकण्यासाठी २३ जानेवारीला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास काही डम्पर आले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सिडकोच्या पथकाने चिर्ले येथे जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी सात डम्पर राडारोडा टाकण्यासाठी आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सिडकोच्या पथकाने उरण पोलिसांच्या मदतीने सर्व डम्पर जप्त करून त्यावरील चालक धीरज सरोज (वय २६), विमलेशकुमार मदन (वय २७), राजदेव लोधीया (४९), जगदीश त्रिपाठी (२१) आणि मोहम्मद अकील हुसेन सय्यद (३५), जियारहमान हाझीम अन्सारी (३८) आणि मोहम्मद यासीन नबी रहेम खान (६५) यांच्याविरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा केला आहे.

