

साकेत मैदानावर होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन; ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ ः प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण साकेत मैदानावर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे दिमाखदार सोहळे आयोजित करण्यात आले आहेत; मात्र भारतीय म्हणून संविधानिक हक्क देणाऱ्या या दिवसाचा उत्सव साजरा केल्यानंतर राष्ट्रध्वजाचा कुठेही अपमान होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. सोहळ्यानंतर ध्वज कापडी पिशवीत व्यवस्थित बांधून तो तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले आहे.
भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन उद्या सोमवारी (ता. २६) दिमाखात साजरा होणार आहे. यासाठी संपूर्ण देशात ध्वजारोहणासह विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात उद्या एकाच वेळी सामूहिक कवायतींचे आयोजन सर्व शाळांमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्यातील शाळाही या कवायतींमध्ये सहभागी होणार आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्येही कवायती, एनसीसी परेड होणार असून विद्यार्थी त्यासाठी मेहनत घेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांमध्येही ध्वजारोहण होणार आहे. अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकेत दीर्घ कालावधीनंतर नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. ठाण्यासह सहा महापालिकांमध्ये निवडणुका पार पडल्या असल्या तरी महापौर निवड झालेली नाही. त्यामुळे यंदाही संबंधित पालिका आयुक्तांच्या हस्तेच ध्वजारोहण होणार आहे; पण प्रमुख आकर्षण असलेले जिल्ह्याचा ध्वजारोहण कार्यक्रम दिमाखदार होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता साकेत येथील पोलिस मैदानात ध्वजारोहण होणार आहे. या वेळी चीफ वॉर्डन आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने नागरी संरक्षण दलाचे एक प्लॅटून प्रथमच संचलन करणार आहेत. या सोहळ्यास जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, आणीबाणी सत्याग्रही, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, नागरिक, शासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी अशा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
...............
राष्ट्रध्वज तहसील कार्यालयात जमा करा
ध्वजसंहितेतील सर्व नियमांचे व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यांमध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी हे राष्ट्रध्वज तहसील कार्यालयात सुपूर्द करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
...................
वेळेचे बंधन
ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी सकाळी ८.३० ते १० वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने आवाहन केले आहे. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहणाचा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० पूर्वी किंवा सकाळी १० वाजल्यानंतर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
...................
बाजारात लगबग
प्रजासत्ताक दिनासाठी बाजारात गर्दी पाहायला मिळाली. तिरंगी कपडे, बांगड्या, टोपी, बॅचेस, ओढण्या आणि साड्यांनाही मागणी होती, असे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात तिरंगा साडी ५०० रुपयांपासून उपलब्ध होत्या. टी शर्ट १०० ते ३०० रुपये, टाय बॅच ६ नग ६० रुपये, तिरंगी बिल्ले ३० रुपये डझन, तिरंगी बँड २० रुपयांपासून पुढे, छोटे तिरंगी ध्वज १० रुपये, तिरंगी टोपी ६० रुपये तर बांगड्या ३०० रुपये डझन या भावाने उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.