वाशीमध्ये तीन हजार चालकांवर कारवाई
नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर वाशी वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एकीकडे जनजागृती करण्यात येत आहे, तर दुसरीकडे ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह करणाऱ्या ३७ चालकांचे परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव पाठवले आहेत. तसेच ३२५ जणांविरुद्ध थेट न्यायालयात खटले दाखल केले आहेत. वाशी वाहतूक पोलिसांनी प्रबोधनासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हजार बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या सूचनेनुसार, वाशी वाहतूक शाखेचे अंमलदार रिक्षा, टॅक्सी, बस संघटना तसेच रहिवासी सोसायट्यांमध्ये जाऊन प्रबोधन करीत आहेत. माहितीपत्रके, स्टिकर्स आणि हॅन्डबिल्ससोबतच समाजमाध्यमाचा प्रभावी वापर करून रस्ता सुरक्षेचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नुकतीच वाशी वाहतूक शाखेने सेंट मेरी स्कूलच्या सहकार्याने सुमारे ४०० विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी वाहनचालकांना प्रत्यक्ष भेटून नियमांचे पालन करण्याचे भावनिक आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एकीकडे जनजागृती करण्यात येत असताना वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान वाशी वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर एकूण तीन हजार ८५ कारवाया केल्या आहेत. तसेच त्यांच्यावर तब्बल २० लाख ३२ हजार ७५० रुपयांचा दंड आकारला आहे. त्याचप्रमाणे ६९ हजारांचा प्रलंबित दंडदेखील वसूल केला आहे. त्याशिवाय वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ३७ चालकांवर कारवाई करून त्यांचा परवाना निलंबित करण्याबाबतचे प्रस्ताव आरटीओकडे पाठवले आहेत. तसेच ३२५ जणांविरुद्ध थेट न्यायालयात खटले दाखल केले आहेत.
कारवाई सुरू राहणार!
नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचवावा, हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू राहील, असे वाशी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील कदम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

