‘चित भी मेरी, पट भी मेरा’

‘चित भी मेरी, पट भी मेरा’

Published on

भिवंडी, ता. २५ (वार्ताहर) : भिवंडी महापालिका निवडणुकीदरम्यान घडलेल्या राजकीय हालचालींमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्या राजकीय खेळीची. समाजवादी पक्षाचे आमदार असतानाही संपूर्ण निवडणूक काळात त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या उमेदवारांचा प्रचार केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, निकालानंतर सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ अपुरे पडताच सर्व तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र करून ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ची स्थापना करण्यात आली आणि त्यात पुन्हा रईस शेख समाजवादी पक्षाचे आमदार म्हणून अग्रस्थानी दिसून आले.
विशेष म्हणजे या फ्रंटमध्ये रईस शेख यांनी समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक असा उल्लेख करताच संपूर्ण शहरात आश्चर्याची लाट पसरली. निवडणुकीपूर्वी समाजवादीच्या उमेदवारांविरोधात प्रचार करून, इतर पक्षांचे उमेदवार निवडून आणल्यानंतर पुन्हा समाजवादीचे नगरसेवक असल्याचा दावा केल्याने ‘चित भी मेरी, पट भी मेरा’ या उक्तीप्रमाणे त्यांनी आपणच पालिकेतील खरे ‘किंगमेकर’ असल्याचे दाखवून दिल्याची चर्चा रंगली आहे.
समाजवादीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार करत त्यांना पराभूत करण्यात आल्याचेही चित्र दिसून आले. मात्र, निकालानंतर सत्तेसाठी आवश्यक संख्याबळ अपुरे पडताच पुन्हा पक्षाची आठवण झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनीही आमदार शेख यांना धर्मनिरपेक्ष पक्षांची सत्ता महापालिकेत स्थापन व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे पत्र पाठवले. त्यामुळे शेख आणि आझमी यांच्यातील वाद हा केवळ दिखाऊ होता का, नागरिकांची दिशाभूल करण्यासाठीच हे राजकीय नाट्य रचले गेले का, असा सवाल शहरात उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, समाजवादीच्या पराभूत उमेदवारांकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, सध्या काही बोलणार नाही, योग्य वेळी सर्व काही सांगू, अशी प्रतिक्रिया देण्यात आली. तर दुसरीकडे, निवडून आलेल्या नगरसेवकांना ‘सेक्युलर फ्रंट’च्या माध्यमातून आपल्या कवेत घेणारे रईस शेख यांना समाजवादी पक्षाचे नगरसेवकही आपलेच असल्याचा दावा केला जात आहे. या सर्व घडामोडींनंतर ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’चे हे राजकीय नाट्य प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरणार, की अंतर्गत विसंवाद पुन्हा उफाळून येणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

आझमी-शेख यांच्यातील दरीत वाढ
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष अबू आझमी आणि आमदार रईस शेख यांच्यात एक वर्षापासून सुरू असलेला अंतर्गत वाद निवडणुकीपूर्वी काहीसा शांत झाल्याचे चित्र होते. मात्र उमेदवारी देताना रईस शेख समर्थकांना डावलण्यात आल्याने दोघांमधील दरी पुन्हा वाढली. हा वाद न मिटल्याने शेख यांनी मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी थेट संपर्क साधत, स्थानिक काँग्रेस नेतृत्वाला अंधारात ठेवून भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसचे तब्बल ४५ ‘एबी फॉर्म’ मुंबईतून मिळवले. त्याआधारे आपल्या समर्थकांची काँग्रेसमधून उमेदवारी निश्चित करण्यात आली. काही समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधून उमेदवारी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com