तर यांचे निशाण पुसून टाकू

तर यांचे निशाण पुसून टाकू

Published on

...तर यांचे निशाण पुसून टाकू!
- वनमंत्री नाईक यांनी पुन्हा डिवचले
- महायुतीमुळे ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपची परवड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाचा महापौर नवी मुंबईत झाला. मिरा-भाईंदरमध्ये महापौर बसवला. ठाण्यातील यश थोडक्यात गेले. पण जिल्हा बँक असो वा जिल्हा परिषद सर्वत्र विजय मिळवला. त्यामुळे किल्ले कोणाचे नसतात. आताही पक्षाने जर एक इशारा केला तर यांचे नामोनिशाण पुसून टाकेन, असा पुनरुच्चार वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता ठाण्यात केला. महायुतीमुळे भाजपच्या घोड्याचे लगाम खेचले गेल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील कार्यकर्ते खूश नाहीत. केवळ पक्षशिस्तीमुळे ते शांत आहेत, असेही नाईक या वेळी म्हणाले.

ठाण्यातील वंदे मातरम् संघ आयोजित माघी गणेश जन्मोत्सवात गणपतीच्या दर्शनासाठी वनमंत्री गणेश नाईक आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, की नेत्याला जशी खासदारकी, आमदारकी मिळते तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी. यासाठी महायुती करण्याऐवजी प्रत्येकाने आपले घोडे मैदानात आणावेत. युद्ध संपल्यानंतर महायुतीतील सगळे नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चालणारे भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिंदे सेना, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस यातून ज्याचे नगरसेवक जास्त त्याला संधी देण्यात यावी. त्याप्रमाणे दुसरी पदे वाटता आली असती, असे आपले व्यक्तिगत मत होते. त्यावर पक्षश्रेष्ठींनी निर्णय दिला नाही. आता ठाण्यातील भाजपचा कार्यकर्ता हा खूश नाही. कल्याणमधला कार्यकर्ता खूश नाही. उल्हासनगरमधला कार्यकर्ता खूश नाही.

ठाण्यात करामत का झाली नाही?
नवी मुंबईतदेखील महायुतीत जागावाटपावरून बोलणी झाली होती. आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादीत असताना नवी मुंबईचा महापौर त्या त्या पक्षाचा झाला. भाजपत आल्यानंतर नवी मुंबईत भाजपचा कारभार चालेल, असे आपण म्हटले होते. पण महायुतीत १११ पैकी ५७ जागा त्यांनी मागितल्या. म्हणजे मोठे भाऊ ते होण्याचा प्रयत्न करीत होते. ज्या दिवशी अर्ज भरण्याचा दिवस आला तेव्हा त्यांनीसुद्धा एबी फॉर्म वाटले आणि आम्हीसुद्धा वाटले हे चांगले झाले, असे वक्तव्य नाईक यांनी केले. पण ठाण्यात ही करामत का करता आली नाही, असे म्हणत त्यांनी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

...तर भाजपचे महापौर झाले असते
महायुती झाली नसती तर ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत भाजपचा महापौर झाला असता. आताही केवळ पक्षशिस्त म्हणून कार्यकर्ते शांत आहेत, असेही त्यांनी सध्या सुरू असलेल्या महापौर पदाच्या वादावरून अप्रत्यक्षपणे शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com