खालापूरात राष्ट्रवादी अडचणीत

खालापूरात राष्ट्रवादी अडचणीत

Published on

खालापुरात राष्ट्रवादी अडचणीत
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मनोमिलनासाठी धाव
खालापूर, ता. २७ (बातमीदार) ः जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील सावरोली गटामध्ये उमेदवारीवरून सुरू असलेले नाराजीनाट्य संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे सक्रिय झाले आहेत. सावरोली गटातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन तटकरे यांनी भेट घेतली.
सावरोली जिल्हा परिषद गट (पूर्वीचा वडगाव गट) हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. २०१७ च्या निवडणुकीत सुरेश पाटील यांच्या पत्नी पद्मा पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा दोन हजार ७०६ मतांच्या फरकाने पराभव केला होता. सुरेश पाटील यांची या भागात मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे. यंदा हा गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सुरेश पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ऐनवेळी वरिष्ठांच्या सूचनेनुसार पाटील यांना माघार घ्यावी लागली आणि संतोष बैलमारे यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयामुळे पाटील समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी सुरेश पाटील यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. नेत्यांमध्ये जरी मनोमिलन झाले असल्याचे चित्र दिसत असले, तरी सुरेश पाटील यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी दूर झाली आहे का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. नेत्यांच्या आवाहनाला कार्यकर्ते प्रतिसाद देतात की निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळते, याचे उत्तर निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

लढत होणार चुरशीची
सावरोली गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संतोष बैलमारे रिंगणात आहेत. बैलमारे यांच्यविरोधात महायुतीने ज्ञानेश्वर गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. ज्ञानेश्वर गायकवाडदेखील या भागातील तुल्यबळ नेते मानले जातात. यामुळे राष्ट्रवादीला विजयासाठी सुरेश पाटील यांची साथ मिळणे अनिवार्य आहे. या लढतीत सुरेश पाटील हे किंगमेकर ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही लढत मोठी रंगतदार होणार आहे.

फोटो- सुरेश पाटील यांची भेट घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com