स्वीकृतसाठी मोर्चेबांधणी

स्वीकृतसाठी मोर्चेबांधणी

Published on

‘स्वीकृत’साठी मोर्चेबांधणी
निष्ठावंतांना लागणार लॉटरी; बंडखोरांना चाप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ठाणे महापौरपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच पालिकेत मागच्या दारातून सभागृहात जाण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे बाजूला पडलेल्या निष्ठावंतांसह बंडखोरी केलेलेही रांगेत उभे आहेत. काही पराभूत माजी नगरसेवकही घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पण मिळालेल्या महितीनुसार बंडखोरी करणाऱ्यांना ही संधी नाकारण्यात येणार आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदी यंदा निष्ठावंतांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीचा धुरळा शांत झाला असला तरी सत्ता स्थापना आणि महापौर निवड अजून शिल्लक आहे. ठाणे महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले असून, एकहाती बहुमत मिळवलेल्या शिवसेना शिंदे गटाचा शिलेदारच ठाण्याचा प्रथम नागरिक बनणार आहे. महापौर कोण होणार याचे सस्पेन्स संपून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विशेष महासभा होण्याची शक्यता आहे. या वेळी १३१ नगरसेवक सभागृहात पाऊल ठेवणार आहेत. त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणखी १० स्वीकृत नगरसेवकही सभागृहात येणार आहेत. पण त्यासाठी आतापासूनच इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे आणि स्थानिक नेतृत्वाकडे मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.

पालिका निवडणुकीत बंडखोरी केलेले शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी स्वीकृतसाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला उमेदवारी मिळावी यासाठी जसा परिसरातील नागरिकांचा पाठिंबा मिळवला होता त्याच पद्धतीने स्वीकृतच्या नावाने न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये नौपाड्यातून किरण नाकती जोरदार प्रयत्न करीत असल्याचे समजते. दुसरीकडे माजी महापौर अशोक वैती हेसुद्धा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे कार्ड वापरून थोडक्यात हुकलेली संधी पुन्हा साध्य होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. यासह गेली अनेक वर्षे निष्ठेने प्रभागात काम करीत असलेल्या अनेक महिला पदाधिकारीही प्रयत्न करीत आहेत. मात्र या गर्दीतून केवळ एका सूचनेवरून उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या दोन शिलेदारांची नावे स्वीकृतसाठी निश्चित झाली असल्याचे समजते. ही त्यांच्यासाठी लॉटरी समजली जात आहे.

बंडखोरांचा हिरमोड होणार
बंडखोरी करणारे आणि पराभूत उमेदवारांना स्वीकृतसाठी संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाच्या विश्वसनीय सूत्राने दिली. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्या डझनभर इच्छुकांचा हिरमोड होणार आहे. दुसरीकडे भाजप आणि इतर पक्षांतही स्वीकृतसाठी अर्ज, विनंत्या येऊ लागल्या आहेत. त्यापैकी कुणाला संधी मिळते हे पाहावे लागणार आहे.

कोणाच्या पदरात किती स्वीकृत?
ठाणे महापालिकेमध्ये १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे ७५ अधिक एक अपक्ष असे ७६ नगरसेवकांचे बलाबल आहे. भाजपचे २८, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ११, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ८, एमआयएमचे पाच आणि ठाकरे गटाचा एक असे पक्षीय बलाबल आहे. १३१ नगरसेवक असल्याने १३.१ तत्त्वानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या ठरणार आहे. म्हणजे १३ नगरसेवकांच्या मागे एक स्वीकृत असे गणित आहे. यानुसार शिवसेना शिंदे गटाकडे ७६ नगरसेवक असल्याने त्यांचे सहा स्वीकृत नगरसेवक असतील. भाजपच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवक येतील. दोन्ही राष्ट्रवादी आणि एमआयएमकडे तुलनात्मक संख्या कमी असली तरी प्रत्येकी एक अशी तीन स्वीकृत पदे त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com