तिरंग्याखाली निसर्गरक्षणाची शपथ
टिटवाळ्यात निसर्गरक्षणाची शपथ
पक्षी व पर्यावरण संवर्धनाचा जागर
टिटवाळा, ता. २७ (वार्ताहर) : प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून केवळ ध्वजावंदनच नव्हे, तर ‘निसर्ग संवर्धनाचा’ नवा अध्याय टिटवाळ्यात गिरवला गेला. जनताहित फाउंडेशन आणि अंकित स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी पर्यावरण रक्षण, पक्षी संवर्धन आणि संविधानिक मूल्यांची जनजागृती करणारा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्रप्रेम व्यक्त करण्यात आले. त्यानंतर झालेल्या प्रबोधनपर सत्रात जनताहित फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रितेश कांबळे आणि सचिव नेयाज शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘‘देशाच्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत, पण निसर्गाचे संरक्षण करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. पक्षी आणि झाडे वाचवणे ही काळाची गरज असून, निसर्ग वाचला तरच मानवाचे भविष्य सुरक्षित राहील,’’ असा प्रभावी संदेश त्यांनी या वेळी दिला.
सोहळ्याचा मुख्य आकर्षणबिंदू ठरली ती म्हणजे विद्यार्थ्यांची ‘निसर्ग संवर्धन रॅली.’ झाडे लावा-झाडे जगवा, पक्षी वाचवा-पृथ्वी वाचवा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा ध्वज आणि पर्यावरण संरक्षणाचे संदेश देणारे फलक होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रॅली काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रहमान खान, अबरार सिद्दीकी यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनताहित फाउंडेशनने राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
दैनंदिन जीवनात बदलाचे आवाहन
अंकित स्कूलचे मुख्याध्यापक कमलेत तिवारी आणि शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकचा वापर टाळणे, पाण्याची बचत करणे आणि उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची सोय करण्याचे आवाहन केले. केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

