स्कुल बस सुरक्षितता समिती सतर्क
स्कूल बस सुरक्षितता समिती सतर्क
४,८६८ स्कूल बस, व्हॅनची केली तपासणी
शालेय परिसरात असणार वॉच
ठाणे शहर, ता. २७ (बातमीदार) ः बदलापुरात स्कूल व्हॅनमध्ये बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने पुन्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकारिता निर्माण करण्यात आलेली वाहतूक आणि प्रादेशिक परिवहन विभागाची स्कूल बस सुरक्षितता समिती सतर्क झाली आहे. समितीमार्फत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे. यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने चार हजार ८६८ स्कूल बस आणि धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून ५२४ वाहनांवर कारवाई केली आहे. समितीकडून शाळा परिसरात वॉच ठेवण्यात आला असून, विद्यार्थी वाहतुकीबाबत शाळा व स्कूल बस, व्हॅनचालकांना सुरक्षिततेचे निर्देश दिले जात आहेत.
बदलापुरात गतवर्षात घडलेल्या बालिकांवरील अत्याचारांच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी सर्वच वाहने महिला आयोग, महिला व बालकल्याण विभाग, पोलिस, वाहतूक आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात आली होती. अशा घटनांना आळा घालण्याकरिता आयोगाने वाहतूक आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहभागातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्कूल बस सुरक्षितता समिती स्थापन केली आहे. तर ठाणे पोलिस आयुक्तालायकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीने स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसोबतच अवैधपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाया करण्याचा सपाटा लावला आहे.
गेल्या नऊ महिन्यांत समितीने चार हजार ८६८ विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून त्यात दोषी आढळलेल्या ५२४ वाहनांवर ३९.९२ लाखांच्या दंडवसुलीची कारवाई केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांच्या नेतृत्वाखाली शालेय परिसरात स्कूल बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांवर नजर ठेवली जात असून, दोषींवर कारवाई केली जात आहे.
कारवाईचा मुख्य लेखाजोखा
एकूण तपासलेली वाहने : ४,८६८
दोषी आढळलेली वाहने : ५२४
एकूण वसूल केलेला दंड : ३९,९२,०००
तपासणी आणि कारवाई :
वाहने तपासणी दोषी
स्कलू बस २,१३५ १६९
अवैध वाहतूक २,७३३ ३५५
महिला मदतनीस नसलेल्या बस - २
पुरुष मदतनीस नसलेल्या बस - २
(ही कारवाई एप्रिल ते डिसेंबर २०२५ मधील आहे.)
शाळा, पालक समिती, पोलिस, वाहतूक विभाग, प्रादेशिक, शिक्षण विभाग, वाहतूक संघ अशा विविध यंत्रणा सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी समिती कार्यरत आहे. समितीमार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक करण्याच्या नियमावलीचे कटाक्षाने पालन केले जाते की नाही, यावर समिती लक्ष ठेवते.
- पंकज शिरसाट, उपायुक्त, वाहतूक विभाग ठाणे शाखा
समितीमार्फत जनजागृती, संबंधित यंत्रणांसोबत बैठका घेतल्या जातात. पालकांनी अधिकृत विद्यार्थी वाहतूक वाहनांचा वापर करायला हवा. प्रादेशिक परिवहन विभागाकडून व्हॅनसारख्या वाहनांना विद्यार्थी वाहतुकीची परवानगी दिली जाते, याचा लाभ वाहनचालकांनी घ्यायला हवा.
- रोहित काटकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

