वाईन शॉपला स्थानिकांचा विरोध
खारघर, ता. २७ (बातमीदार) : खारघर सेक्टर १३ मधील हावरे टियारा इमारतीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सोसायटीच्या विनापरवाना वाइन शॉप सुरू करण्याच्या हालचालींना परिसरातील रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रस्तावित वाइन शॉपमुळे परिसरातील शांतता, सुरक्षा आणि सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त करत रहिवाशांनी एकत्र येत प्रजासत्ताकदिनी सोमवारी (ता. २६) आंदोलन करून विरोध दर्शवला आहे.
खारघर सेक्टर १३ हावरे टियारा ही निवासी बहुमजली इमारतीत १५८ कुटुंबे असून, सोसायटीत ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले वास्तव्यास आहेत. इमारतीच्या आवारात ५८ व्यावसायिक गाळे असून, बँक, मोबाईल, मेडिकल, शिकवणी वर्ग, दवाखाना अशी विविध दुकाने आहेत. अशा ठिकाणी वाइन शॉप उघडणे अनुचित असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. वाइन शॉप सुरू झाल्यास दारू पिण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढेल. तसेच स्थानिकांची गैरसोय, भांडणे, असभ्य वर्तन, तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रजासत्ताकदिनी रहिवाशांनी एकत्र येत इमारत व्यवस्थापन, स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच महापालिका व संबंधित उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. वाइन शॉपला परवानगी देऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. दरम्यान, प्रशासनाने रहिवाशांच्या भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, तसेच निवासी परिसरात अशा प्रकारच्या व्यवसायांना परवानगी देऊ नये, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
टियारा सोसायटीच्या आवारात सोसायटीची कोणतीही परवानगी नसताना वाइन शॉप सुरू करण्यासाठी हालचाल सुरू आहे. वाइन शॉपला आमचा प्रखर विरोध आहे.
- संदीप राणे, अध्यक्ष, टियारा सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

