इ-गव्हर्नन्स सुधारणा स्पर्धेमध्ये पनवेल अव्वल
पनवेल, ता. २७ (बातमीदार) : मुख्यमंत्री १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणा स्पर्धेचा निकाल सोमवारी (ता. २६) जाहीर झाला. पनवेल महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत मोठे यश संपादन केले आहे.
राज्यातील एकूण २९ महापालिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई यांसारख्या मोठ्या व अनुभवी महापालिकांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत पनवेलने अव्वल स्थान मिळविल्याने कौतुक होत आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाखाली परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे आणि संगणक विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांनी केलेल्या नियोजनबद्ध व अथक परिश्रमाचे हे यश मानले जात आहे. पनवेल महापालिकेने यापूर्वी १०० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमातही उल्लेखनीय कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळविला होता.
ई-गव्हर्नन्समधील उल्लेखनीय सुधारणा
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात महापालिकेचे संकेतस्थळ अधिक सुलभ, सुरक्षित व अद्ययावत करणे, प्रभावी डॅशबोर्ड विकसित करणे, ‘आपले सरकार’ पोर्टलअंतर्गत नागरिकांना विहित वेळेत सेवा पुरवणे, कार्यालयीन कामकाजात ई-ऑफिसचा प्रभावी वापर, व्हॉट्सॲप चॅटबोट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), तसेच जीआरएस प्रणालीचा वापर अशा विविध घटकांचा समावेश होता.
‘ई-ऑफिस’चा लाभ
आयुक्त मंगेश चितळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या ‘पनवेल कनेक्ट ॲप’मुळे नागरिकांना विविध सेवा अधिक सुलभ व वेगाने उपलब्ध झाल्या. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा स्पर्धेतील कामगिरीवर मोठा सकारात्मक परिणाम झाला.
पारदर्शक मूल्यांकन
या सर्व घटकांचे सादरीकरण पनवेल महापालिकेने १० जानेवारीला केले होते. या स्पर्धेचे मूल्यांकन क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने पारदर्शक पद्धतीने केले. तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांची प्रेरणा, तसेच आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त (संगणक) स्वरूप खारगे, विभागप्रमुख वर्षा पालवे व संबंधित कर्मचाऱ्यांनी केलेल्या संघटित प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

