सुधागडाचा ऐतिहासिक ‘पूर्व बुरुज’ पर्यटकांसाठी खुला
सुधागडाचा पूर्व बुरूज आता पर्यटकांसाठी खुला
ट्रेक क्षितिज संस्थेची श्रमदान मोहीम यशस्वी
डोंबिवली, ता. २७ : ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या डोंबिवलीतील ट्रेक क्षितिज संस्थेच्या शिलेदारांनी सुधागड किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाचा नवा अध्याय लिहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झाडीझुडपांत हरवलेला किल्ल्याच्या पूर्व बुरूज परिसरातील मार्ग श्रमदानातून पूर्णपणे मोकळा करण्यात आला असून, आता हा ऐतिहासिक ठेवा पर्यटकांना सहज पाहता येणार आहे.
डिसेंबर २०२४मध्ये केलेल्या पाहणीत पूर्व बुरुजाकडे जाणारी वाट दाट गवत, काटेरी झुडपे आणि दरडींमुळे बंद असल्याचे संस्थेच्या निदर्शनास आले होते. ही अडचण दूर करण्यासाठी २४ आणि २५ जानेवारीला विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या सदस्यांनी सलग मेहनत घेऊन सुमारे एक किलोमीटरचा मार्ग स्वच्छ केला. विशेष म्हणजे मूळ वाट काही ठिकाणी धोकादायक असल्याने गिर्यारोहकांनी श्रमदानातून एक सुरक्षित पर्यायी मार्गही तयार केला आहे.
सुधागडच्या संरक्षण फळीत पूर्व बुरूज अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. भोरप्याची नाळ आणि घोडजीन वाटेने येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी या बुरुजाची रचना करण्यात आली होती. हा बुरूज शत्रूच्या ताब्यात गेला असता तर महादरवाजापर्यंत पोहोचणे त्यांना सोपे झाले असते. त्यामुळे या बुरुजाचे संवर्धन ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. या मोहिमेत प्रशांत राबांडे, महेंद्र गोवेकर, राहुल मेश्राम, प्रिया कराडकर, संदेश मुठे, कपिल कुलकर्णी, शैलजा धनगर यांच्यासह तृप्ती मांजरेकर, सागर रासम आणि अन्य २० शिलेदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
दुर्गसेवकांचा चिकाटीचा प्रवास
मोहीम प्रमुख शुभम सावंत यांनी सांगितले, की मांडवीकोटावरील यशस्वी मोहिमांनंतर सुधागडचा पूर्व बुरूज मोकळा करण्याचा आमचा संकल्प होता. संघातील सदस्यांच्या चिकाटीमुळे आज हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा सर्वांसमोर आला आहे. मोहिमेत बुरुजावरील पायऱ्यांवर साचलेली माती, दगड आणि झुडपे हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

