महापौरपदाचा निर्णय गुलदस्त्यात!

महापौरपदाचा निर्णय गुलदस्त्यात!

Published on

वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २७ : महापालिकेच्या महापौरपदासाठी जोरदार राजकीय हालचालींना वेग आला आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी हे पद आरक्षित झाल्याने शेतकरी कामगार पक्षातून पूर्वी आलेले नितीन पाटील आणि काही महिन्यांपूर्वी याच पक्षातून कमळ हातात घेतलेल्या ममता म्हात्रे ही दोन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत, मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी सातत्याने एकनिष्ठ राहिलेल्या इतर नगरसेवकांनाही संधी दिली जाणार का, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कार्यक्रमापेक्षा वेगळा निर्णय घेत १० फेब्रुवारीला महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडून संयुक्त निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. आमदार ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा पनवेल महापालिकेवर भाजपप्रणीत महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हांवर निवडून आलेल्या एकूण ५९ नगरसेवकांनी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळवून दिले आहे. यामध्ये सर्वात आधी बिनविरोध गटनेते म्हणून निवडून आलेल्या नितीन पाटील यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

२०१७ मध्ये नितीन पाटील आणि प्रीतम म्हात्रे यांच्यातील प्रभाग क्रमांक १८ मधील लढत चांगलीच गाजली होती. हा प्रभाग अत्यंत संवेदनशील ठरला असून, त्या काळात पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. शेकापमध्ये असतानाच म्हात्रे-पाटील यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत होता. प्रीतम म्हात्रे यांनी शेकापकडून उरण विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुकीत नितीन पाटील यांच्या विरोधातील अर्ज बाद झाल्यानंतर ममता म्हात्रे यांच्या विरोधातील उमेदवारी अर्जही मागे घेण्यात आल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या.

महापौरपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण निघाल्यामुळे नितीन पाटील आणि ममता म्हात्रे हे प्रमुख दावेदार म्हणून पुढे आले आहेत. परेश ठाकूर यांनी निवडणूक न लढवल्यामुळे या दोघांसाठी संधी खुली झाली आहे. मात्र, गटनेतेपद मिळूनही नितीन पाटील यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडेल की नाही, याबाबत अद्याप शाश्वती नाही.

लवकरच अंतिम निर्णय
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे महापौर व उपमहापौर निवड १० फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी (ता. २८) महायुतीची अधिकृत नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालानंतर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या सल्ल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उपमहापौरपद कोणाला?
महापौरपदाचा निर्णय प्रलंबित असतानाच उपमहापौरपदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या नगरसेवकाला संधी दिली जाणार की पक्षातील एखाद्या ज्येष्ठ नगरसेवकाला एक वर्षासाठी हे पद दिले जाणार, याकडे महायुतीतील ५९ नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

एकूण संख्येत अपक्ष उमेदवार वगळला!
पनवेल महापालिकेत महाविकास आघाडीचे एकूण १८ नगरसेवक निवडून आले असून, महायुतीचे ५९ नगरसेवक आहेत. आमदार विक्रांत पाटील यांच्या भगिनी स्नेहल स्वप्नील ढमाले यांनी प्रभाग क्रमांक १८ मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या प्रभागात भाजपकडून एबी अर्ज दिलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्याने स्नेहल ढमाले बिनविरोध निवडून आल्या, मात्र भाजपकडून एकूण नगरसेवक संख्येमध्ये अपक्ष उमेदवाराला स्थान देण्यात आलेले नसून त्यामुळे महायुतीची संख्या ५९ धरली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com