भिवंडीत सिमेंट रस्त्यांची दैना
भिवंडी, ता. २७ (बातमीदार) : शहरात सिमेंट काँक्रीट (आरसीसी) रस्त्यांची कामे अर्धवट राहिल्याने; तसेच अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे रस्ते असमान व खड्ड्यांनी भरलेले असल्याने शहराची दैनंदिन वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. परिणामी, वाहनचालक व नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. विशेष म्हणजे, अशा गंभीर परिस्थितीतही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने या मुख्य समस्येवर ठोस भूमिका मांडलेली नाही.
शहरात ‘विकास’ या नावाखाली विविध कामे सुरू असली, तरी राज्य सरकारकडून वेळोवेळी निधी उपलब्ध होऊनही गेल्या दोन वर्षांत भिवंडी महापालिका प्रशासनाने नागरिकांना दिलासा देईल, असे एकही काम पूर्ण केलेले नाही. शहरातील अनेक जोडरस्ते आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण न करता; तसेच पालिकेच्या विकास आराखड्याचा विचार न करता सिमेंटचे रस्ते बांधण्यात आले. परिणामी, गटारांची कामे अर्धवट राहिली असून संपूर्ण रस्ता प्रणाली विस्कळित झाली आहे.
एका बाजूला सिमेंट रस्त्यांचे काम अपूर्ण असतानाच, दुसऱ्या बाजूला भूमिगत गटार, गॅसवाहिनी, सीसीटीव्ही वाहिनी, वीजवाहिन्या आदींसाठी सतत खोदकाम सुरू आहे. नुकतेच बनवलेले काँक्रीट रस्तेही काही दिवसांतच वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत. या कामकाजामुळे नागरिकांच्या कररूपाने जमा झालेला पैसाही मातीमोल होत आहे.
शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत जोडरस्त्यांचे दीर्घकालीन आणि समन्वयात्मक नियोजन महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे व नगररचना विभागाकडे नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याच नियोजनशून्य कारभारामुळे भिवंडी शहराची दळणवळण व्यवस्था बकाल झाली आहे. या संपूर्ण प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन आयुक्तांनी रचनात्मक, समन्वयपूर्ण आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून शहरातील रस्त्यांचा विकास करावा, अशी जोरदार मागणी आता भिवंडीतील नागरिकांकडून होत आहे.
एका रस्त्यासाठी पुन्हा-पुन्हा खर्च
भिवंडी शहरातील धामणकर नाका ते तीनबत्ती, पुढे मंगल बाजार ते महापालिका मुख्यालय (जकात नाका) या महत्त्वांच्या मार्गावरील आरसीसी रस्त्याचे काम काही वर्षांपासून अतिशय संथ गतीने सुरू असून ते अद्याप अर्धवट आहे. संबंधित ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाला दुरुस्तीसाठी राखीव निधी खर्च करावा लागत आहे. म्हणजेच एका रस्त्यासाठी पुन्हा-पुन्हा खर्च करून पालिकेची तिजोरी रिकामी होत आहे.
खड्ड्यांमुळे प्रवास कठीण
कोट्यवधी रुपये खर्च होऊनही शहरातील रस्त्यांवरील खड्डे अद्याप बुजविलेले नाहीत. रस्त्याच्या कडेला असलेले आरसीसी भाग आणि पेव्हर ब्लॉक रस्त्यांमधील मोठे गॅप तसेच असमान पृष्ठभाग दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. पावसाळा संपूनही अनेक ठिकाणी खड्डे तसेच असल्याने दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त आचारसंहिता लागू असल्याने शहरातील बांधकामे तात्पुरती थांबविली होती. निवडणुका झाल्याने आता रस्तेदुरुस्ती आणि आरसीसी रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होईल
- जमील पटेल,शहर अभियंता भिवंडी महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

