ई-गव्हर्नन्स स्पर्धेत नवी मुंबईचा चौथा क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ : राज्य सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय मूल्यमापनात नवी मुंबई महापालिकेने चौथा क्रमांक पटकावला आहे. नवी मुंबईला उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यातील २९ महापालिकांमध्ये १८१ गुण मिळवले आहेत.
मागील वर्षभरापासून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेने नागरिकांना ऑनलाइन सेवा पुरविण्याकडे भर दिला असून, जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये नागरिकांना करभरणा करणे असो की पालिकेशी संबंधित जन्म-मृत्यू प्रमाणपत्रापासून वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून घेणे असो, सुविधांविषयी तक्रार सूचना करणे असो की पालिकेशी संबंधित माहिती मिळविणे अशा सर्वच बाबींमध्ये संकेतस्थळ, माय एनएमएमसी ॲप, सरकारच्या आपले सरकार पोर्टलशी संलग्नता, व्हॉट्सॲप चॅटबॉट, डॅशबोर्ड, ई-ऑफिस, एआय, ब्लॉकचेन, जीआयएस आधारित सेवा अशा विविध प्रकारे ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व बाबींचे सखोल मूल्यमापन ‘क्यूसीआय’सारख्या नामांकित त्रयस्थ संस्थेमार्फत १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये करण्यात आले.
संकेतस्थळ अनुपालन मूल्यमापनाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळामध्ये वापरकर्ता-सुलभ इंटरफेस, सर्वसमावेशक सुलभता, नियमितपणे अद्ययावत होणारी माहिती, प्रभावी शोध सुविधा, उच्च दर्जाची माहिती सुरक्षा, नागरिकांसाठी अभिप्राय व तक्रार निवारणाची सक्षम यंत्रणा तसेच सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनुपालन व प्रमाणन ही सर्व आवश्यक वैशिष्ट्ये प्रभावीपणे उपलब्ध असल्याचे आढळून आले. सरकारच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेने ६८ लोकसेवांची ऑनलाइन उपलब्धता केलेली असून, त्यांचे आपले सरकार पोर्टलशी प्रभावी एकात्मीकरण केले आहे. याव्यतिरिक्त ३९ महापालिकांशी संबंधित सेवाही ऑनलाइन उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सेवा वितरणाचा कालावधी कमी करण्यासाठी शासन प्रक्रियेची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत व प्रभावी निराकरण होण्यासाठी सक्षम तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत असल्याचे मूल्यमापनात निदर्शनास आले.
कार्यालयीन कामकाजात वेग
ई-ऑफिस अनुपालन मूल्यमापनांतर्गत नवी मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र विकसित ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. एक हजारपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी या प्रणालीचा नियमित वापर करीत आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजात वेग, पारदर्शकता आली असून कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

