''लाल वादळ'' मुंबईच्या वेशीवर धडकले  ; २५ हजार आंदोलकांचे मंत्रालयाच्या दिशेने कूच

''लाल वादळ'' मुंबईच्या वेशीवर धडकले ; २५ हजार आंदोलकांचे मंत्रालयाच्या दिशेने कूच

Published on

‘लाल वादळ’ मुंबईच्या वेशीवर धडकले
प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभेचा लाँग मार्च
शहापूर, ता. २७ (बातमीदार) ः जमिनीचे हक्क, वनपट्टे आणि प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या २५ हजारांहून अधिक आंदोलकांचा ‘लाँग मार्च’ मंगळवारी (ता. २७) दुपारी मुंबईच्या वेशीवर धडकला. हा लाँग मार्च रविवारी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून माजी आमदार जीवा पांडु गावित, डॉ. डी. एल. कराड, राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघाला आहे. हातात लाल झेंडा आणि अनवाणी पायांनी ‘आता माघार नाही, थेट मंत्रालय गाठणार’ असा पवित्रा घेत हे वादळ मुंबईच्या वेशीवर धडकले. दिंडोरी, सुरगाणा, पेठसह नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील आदिवासी महिला व पुरुष, शेतकरी, शेतमजुरांचा या मार्चमध्ये सहभाग आहे.
अखिल भारतीय किसान सभेच्या मार्चची ही पाचवी वेळ आहे. दरवेळी मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा झाली. समित्या नेमल्या गेल्या, परंतु केवळ आश्वासने मिळाली. या मार्चच्या माध्यमातून सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. जर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर संघर्ष अधिक तीव्र केला जाईल. लाल झेंड्यांच्या साक्षीने सुरू असलेला हा पायी मोर्चा केवळ मागण्यांची यादी नसून, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. मंत्रालयातल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याशिवाय माघार घेणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारशी सुरू असलेल्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संवादातून काय निष्पन्न होते, यावर या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधी मंडळाला मंगळवारी दुपारनंतर चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. या प्रतिनिधी मंडळात माजी आमदार जे. पी. गावित, माकपाचे पोलिट ब्युरो सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, किसान सभेचे राष्ट्रीय संयुक्त सचिव अजित नवले आणि आमदार विनोद निकोले यांचा समावेश आहे.

महामार्गावर ठिकठिकाणी पोलिस तैनात
वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, वनजमीन आणि गायरानधारकांना स्वतंत्र सातबारा उतारे द्यावेत, शिक्षणाचे खासगीकरण थांबवावे आणि पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी स्थानिक नागरिकांना द्यावे, या मागण्यांसाठी हा मार्च काढण्यात आला आहे. या मोर्चात २५ हजारांहून अधिक शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मोर्चा जाणाऱ्या मुंबई- नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मोर्चेकऱ्यांच्या थांबण्याच्या व रात्री विश्रांतीच्या ठिकाणांची पाहणी करून तेथेदेखील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी मंगळवारी दुपारी शहापूरला भेट देऊन आढावा घेतला. बुधवारी (ता. २८) सकाळी साडेआठ वाजता पुन्हा मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

वाहतूक कोंडी
मोर्चेकऱ्यांनी महामार्ग व्यापल्याने याचा फटका नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बसला. नाशिकहून कसारा स्थानकात येणाऱ्या बसगाड्यादेखील विलंबाने आल्याने मुंबईहून लोकलने येऊन नाशिकला जाण्यासाठी कसारा स्थानकात उतरलेल्या प्रवाशांना तासनतास बसगाड्यांची प्रतीक्षा करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com