वांद्रे पूर्वेतील स्कायवॉक खुला

वांद्रे पूर्वेतील स्कायवॉक खुला
Published on

वांद्रे पूर्वेतील स्कायवॉक खुला
पालकमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे न्यायालय, वांद्रे-कुर्ला संकुल, म्हाडा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या नवीन स्कायवॉकचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते सोमवारी (ता. २६) करण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेमार्फत हा उच्च प्रतीचा, दीर्घकाळ टिकणारा व आधुनिक सुविधांनी युक्त स्कायवॉक उभारण्यात आला आहे. या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक आमदार वरुण सरदेसाई, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, उपआयुक्त गिरीश निकम आदी उपस्थित होते. पुनर्बांधणी करण्यात आलेला स्‍कायवॉक प्रजासत्ताकदिनापासून खुला करण्यात आला आहे.
स्कायवॉकचे कामकाज विक्रमी वेळेत पूर्ण करणारे कार्यकारी अभियंता नामदेव रावकाळे, सहाय्यक अभियंता प्रशांत जावळे, दुय्यम अभियंता अमित दसूरकर यांचा पालकमंत्री शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने संबोधित करताना पालकमंत्री शेलार म्हणाले की, मुंबई उपनगरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम, सुरक्षित आणि नागरिक केंद्रित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व) ते पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कलानगर जंक्शन यादरम्यान उभारण्यात आलेला नवीन स्कायवॉक नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाशी थेट जोडणी असल्यामुळे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या स्‍कायवॉकमुळे वांद्रे (पूर्व) परिसरातील पादचारी वाहतूक अधिक सुरक्षित होईल. प्रवासाचा वेळ वाचेल आणि अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे बांधणी करण्याचा मध्यरात्रीचा मर्यादित कालावधी, खालील अनंत काणेकर रस्त्यावरील पादचाऱ्यांची वर्दळ यामुळे स्कायवॉक उभारण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागली. तसेच, उपयोगिता वाहिन्यांचे स्थलांतर अशी विविध आव्‍हाने असतानाही स्कायवॉकचे काम निर्धारित कालावधीमध्‍ये पूर्ण करण्यात आले. अत्यंत आव्हानात्मक, कौशल्याचे हे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले, असे शेलार यांनी नमूद केले.

अशी आहे
१ वांद्रे रेल्वे स्‍थानक (पूर्व) पासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कलानगर जंक्शनपर्यंतचा नवीन स्कायवॉक एकूण ६८० मीटर लांबीचा व सरासरी ५.४० मीटर रुंदीचा आहे.
२ पादचाऱ्यांच्या विविध ठिकाणांहून सहज प्रवेशासाठी चार जिने आहेत. सुलभ मार्गक्रमण करण्यासाठी दोन स्वयंचलित सरकत्‍या जिन्‍यांची जोड आहे.
३ सुरक्षितता आणि निगराणीसाठी १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्‍यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com