समाजासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान होणार

समाजासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान होणार

Published on

बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत बदलापूर शहरासाठी एक महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी घोषणा करण्यात आली आहे. देशपातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरविले जाते, त्याच धर्तीवर बदलापूर शहरातही दरवर्षी विविध क्षेत्रांत समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘आदर्श बदलापूरकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी केली. यंदाच्या प्रजासत्ताक दिनापासून या पुरस्काराची अधिकृत सुरुवात होणार आहे.
पुरस्कारांतर्गत आदर्श डॉक्टर, आदर्श परिचारिका, आदर्श शिक्षक, आदर्श खेळाडू; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच शहरासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार देण्याचाही निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन नागरिकांना समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी व्यक्त केला. या वेळी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित अग्निशमन दलाचे अधिकारी दामोदर वांगड यांचा नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला उपनगराध्यक्षा प्रियांका दामले, नियोजन समिती सभापती संभाजी शिंदे, भाजपा गटनेते शरद तेली, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्यासह अनेक नगरसेवक, अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करताना समान हक्क, कर्तव्ये आणि मतदानाचा अधिकार ही भारतीय प्रजासत्ताक व्यवस्थेची मूलभूत मूल्ये असल्याचे सांगितले. संविधानामुळेच देशातील प्रत्येक नागरिकाला समान न्याय व संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांची परेड, नृत्य सादरीकरण
बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा झेंडा चौकात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे व मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या हस्ते तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. या वेळी राष्ट्रगीतानंतर महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाला नागरिकांनी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड सादर केली. देशभक्तीपर गीतांवरील नृत्यप्रकार, सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला मान्यवरांनी भरभरून दाद दिली.

बदलापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त हेंद्रेपाडा झेंडा चौकात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड आणि नृत्यप्रकार सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com