चेंबूरस्थित आरसीएफ प्रकल्पातून वायू गळती झालीच नाही

चेंबूरस्थित आरसीएफ प्रकल्पातून वायू गळती झालीच नाही
Published on

आरसीएफ प्रकल्पातून वायुगळती झालीच नाही!
राज्य सरकारचा उच्च न्यायालयात परस्परविरोधी दावा 
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : चेंबूरमधील राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर (आरसीएफ) प्रकल्पातून सप्टेंबर महिन्यात वायुगळती झालीच नसल्याचा दावा राज्य सरकारकडून मंगळवारी (ता. २७) उच्च न्यायालयात करण्यात आला. त्याची दखल घेऊन न्यायिक अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या अहवालाचा दाखला देऊन न्यायालयाने सरकारच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले.  
चेंबूर परिसरातील कंपन्यांच्या तपासणीअंती अशी घटना घडल्याचे आढळले नाही, अशी माहिती राज्य सरकारकडून महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला दिली; मात्र आरसीएफ प्रकल्पातील वायुगळतीच्या घटनेनंतर आरसपासच्या परिसरातील नागरिकांना मळमळणे, उलट्या, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ होण्यासारख्या त्रासांना सामोरे जावे लागले होते, असे नमूद करणारा अहवाल ‘म्हालसा’ने न्यायालयात सादर केला होता. तथापि, राज्य सरकारकडून परस्परविरोधी माहिती न्यायालयात सादर करण्यात आली. तसेच, याबाबतची वृत्त चुकीची असल्याचेही न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने मात्र वृत्तपत्र एवढ्या बेजबाबदारपणे वृत्तांकन कसे करू शकतात, अशी विचारणा राज्य सरकारला केली. तसेच वायुगळतीच्या घटनांबाबतची वृत्ते चुकीची असल्याचे सरकारने ठामपणे सांगावे, आम्ही संबंधित वृत्तपत्रांवर कारवाईचे आदेश देऊ, असे न्यायालयाने नमूद केले. परंतु, ‘म्हालसा’चा अहवाल अद्याप आपल्याला मिळाला नसल्याची माहिती महाधिवक्त्यांनी दिली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने ‘म्हालसा’चा अहवाल सरकारला उपलब्ध करण्याचे आदेश देऊन सुनावणी दोन आठवड्यांसाठी तबकूब केली.
----
वृत्तपत्रांतील घटनांची दखल
सप्टेंबरमध्ये उघडकीस आलेल्या घटनेसह अन्य घटनांबाबत वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. तसेच दुसऱ्या एका घटनेत, तारापूर एमआयडीसी येथील आरती ड्रग्ज लिमिटेडजवळील सालवाड आणि शिवाजीनगरमधील रहिवाशांमध्ये वायुगळतीच्या वृत्ताने भीती पसरली होती. उत्पादनादरम्यान हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या कथित गळतीमुळे धुराचे प्रमाण वाढल्यामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. २१ ऑगस्ट रोजी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मेडली कंपनीत वायुगळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com