सहरचे वक्तव्य बालिशपणाचे
सहरचे वक्तव्य बालिशपणाचे
आमदार आव्हाड यांचे प्रत्युत्तर
ठाणे, ता. २८ : ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा येथील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी केलेल्या भाषणावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. सहरचे वक्तव्य बालिशपणाचे असून, मुंब्रा हा तिरंगाच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीनंतर मंगळवारी मुंब्य्रात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यासंदर्भात आव्हाड यांना विचारले असता, आजकाल प्रत्येक गल्लीबोळात घोषणा दिल्या जातात. तरुणाई कल्पक घोषणा करतात. काही लोक आव्हान देतात. आपण त्यांच्या आव्हानासाठी काही करत नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे वागतो. एखादी लहान मुलगी मिश्किलपणाने बोलली. सोशल मीडियावर तिच्या बालिशपणाची क्रेझ आहे. तिच्या त्या वक्तव्याला काही अर्थ नाही. माझी लहान मुलीनेही म्हटले, चॉकलेट लाया... तर तेही गाजेल. त्यात काय विशेष नाही, असा पलटवार केला. हा देश, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुंब्रादेखील तिरंगा आहे. संविधानाने तिरंगा रंग दिलाय, तुम्ही कुठल्याही एका रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नसल्याचे देखील आव्हाड यांनी स्पष्ट केले.

