मुंबई पोर्टच्या जागेवर गोदी कामगारांना घरे मिळालीच पाहिजेत – ॲड. एस. के. शेट्ये
मुंबई पोर्टच्या जागेवर गोदी कामगारांना घरे मिळालीच पाहिजेत ः ॲड. एस. के. शेट्ये
शिवडी, ता. २७ (बातमीदार) ः मुंबई पोर्टच्या जागेवर अनधिकृतरीत्या राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांना कायमस्वरूपी घरे देण्याचा विचार राज्य सरकार करीत असताना, ज्या बंदर व गोदी कामगारांनी मुंबई पोर्टच्या विकासासाठी आयुष्य घालवले, बंदराचा नावलौकिक वाढवला, त्या गोदी कामगारांना मुंबई पोर्टच्या जागेवर घरे मिळालीच पाहिजेत, असे ठाम मत ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी व्यक्त केले.
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या आऊटडोअर डॉक्स स्टाफ श्री सत्यनारायण महापूजा समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त (ता. २६) दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात गोदी विभागातील कामगार व कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या स्नेहसंमेलनात करमणूक कार्यक्रम म्हणून ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक सादर करण्यात आले. या वेळी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस सुधाकर अपराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कमी मनुष्यबळातही गोदी कामगारांनी मुंबई बंदराची प्रगती साधली आहे. मात्र, बोनसचा समझोता होऊनही अद्याप अंतिम करारावर सह्या झालेल्या नाहीत. तसेच स्टॅगनेट झालेल्या कामगारांचा प्रश्न प्रलंबित असून, तृतीय श्रेणीतून बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांना पगारवाढीत न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. या व इतर उद्योगधंद्यातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भारतभरातील केंद्रीय कामगार संघटनांनी येत्या १२ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली असून, त्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कौटुंबिक सोहळ्यात नवी मुंबई, सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मारुती विश्वासराव यांचा ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बापू घाडीगावकर, पूजा समितीचे अध्यक्ष संदीप घागरे, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस.एस.टी. व ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस अंकुश कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे निवेदन पूजा समितीचे सल्लागार विजय सोमा सावंत यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित गोदी कामगारांच्या कुटुंबीयांनी नाट्यगृह तुडुंब भरले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

