पर्यावरणाची जीवनरेखा संकटात

पर्यावरणाची जीवनरेखा संकटात

Published on

पर्यावरणाची जीवनरेखा संकटात
डहाणू-तलासरीतील कांदळवनाचे ४९४ हेक्टर क्षेत्र बाधित
कासा, ता. २८ (बातमीदार)ः किनारपट्टीचे नैसर्गिक रक्षण, पर्यावरणाचा समतोल टिकवणारी कांदळवने विकासकामे, अतिक्रमणे, मानवी हस्तक्षेपाने धोक्यात आली आहेत. डहाणू-तलासरीतील कांदळवनाचे ४९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने संवर्धनासाठी प्रयत्नांची गरज व्यक्त होत आहे.
वादळांचा तडाखा कमी करणे, समुद्रकिनाऱ्याची धूप थांबवणे, जैवविविधतेचे संवर्धन करणाऱ्या कांदळवनांना ‘कार्बन सिंक’ म्हणून ओळखले जाते. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याची त्यांची क्षमता जास्त असल्याने हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ते पर्यावरणासाठी संरक्षक भिंत ठरतात. महाराष्ट्र शासनाने कांदळवनांचे संरक्षण, पुनर्लागवड आणि संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेण्याची आवश्यकता पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहे. डहाणू, तलासरी तालुक्यातील ४९४ हेक्टर कांदळवन क्षेत्राला राखीव दर्जा देण्यात आला आहे. वाढवण, देताळे, चिंचणी, वळदे, नरपड, आंबेवाडी, चिखले, घोलवड, बोर्डी, चंडीगाव आणि कोलवली भागांतील कांदळवन परिसर पर्यावरण रक्षणाचे महत्त्वाचे काम करत आहेत. या भागात विविध मासे, खेकडे, शिंपले तसेच असंख्य स्थलांतरित, स्थानिक पक्ष्यांचे प्रजनन व निवास आढळतो. त्यामुळे मच्छीमारांच्या व्यवसायालाही मोठा आधार मिळतो. कांदळवन मुळांमुळे समुद्राच्या लाटांचा वेग कमी होतो आणि जमिनीची धूप रोखली जाते. सध्या डहाणू किनाऱ्यालगत चंद्रनगर खाडी, चिखले, नरपड परिसरात वाढती धूप होत असल्याने कांदळवनांचे जतन, पुनर्लागवडीवर भर देण्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
--------------------------------
पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व
- पर्यावरणीय फायद्यांसोबतच कांदळवन पर्यटनाची संधी निर्माण करू शकते. योग्य नियोजन केल्यास स्थानिकांना रोजगारनिर्मितीची साधने उपलब्ध होऊ शकतात. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली पर्यावरणाला हानी होणार नाही. याची दक्षता घेणे तितकेच आवश्यक आहे.
- कांदळवनांमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक जीवसृष्टीचे प्रकार आढळतात. कांदळ झाडांचे लाकूड दीर्घकाळ पाण्यात टिकते, तर त्यांच्या पानांवर मिठाचे स्फटिक जमा होण्याची वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया आढळते. नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय कचऱ्याचे विघटन करण्यास कांदळवन मदत करतात.
-------------------------------------
कांदळवन म्हणजे पर्यावरणाची ‘किडनी’ आहे. जसे आपल्या शरीरात किडनी रक्त शुद्ध करते तसेच कांदळवन प्रदूषण शोषून पर्यावरण शुद्ध ठेवते. त्यामुळे विकास प्रकल्पांच्या युगात कांदळवन जपणे गरजेचे आहे.
- जयंत ओंढे, कांदळवन अभ्यासक, डहाणू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com