धुळीमुळे नाकीनऊ
तलासरी, ता. २८ (बातमीदार)ः तालुक्यातील मुख्य नाक्यावरील महामार्ग पुलाखालून तलासरी बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या परिसरात खड्ड्यांबरोबर धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने दुकानदार, भाजीपाला विक्रेते, आदिवासी महिला, नागरिक बेजार आहेत.
या रस्त्यावर पूर्वी असलेला डांबरी थर पूर्णतः नाहीसा झाला आहे. सध्या रस्त्यावर खडी, माती शिल्लक आहे. महामार्गावर येणाऱ्या वाहनांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहेत. परिणामी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले असून, दिवसभर धुरकट वातावरण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, मुख्य बाजारपेठ असल्याने हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे, पण प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
--------------------------
अपघाताची शक्यता
- पुलाच्या दोन्ही बाजूंना महामार्ग प्राधिकरणाच्या सेवा रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यालगत बांधलेली गटारे मोडकळीस आली असून, अनेक ठिकाणी गटारांची झाकणे उघडी पडली आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
- यासंदर्भात तलासरी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, रस्ते दुरुस्तीचे काम कंत्राटी ठेकेदारांकडे देण्यात आले आहे. तसेच तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
---------------------------------
आरोग्यविषयक तक्रारी
उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचारोगासारख्या आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दम्याचे रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात तलासरी नगर पंचायतीने महामार्ग प्राधिकरणाशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
----------------------------
या रस्त्याचे काम सुरू आहे. तलासरी मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येईल. उडणाऱ्या धुळीवर नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी केली जाणार आहे.
- गुलशन मीना, कंत्राटदार

