

बारामती सहलीच्या आठवणींनी मिलापनगरवासी भावुक
‘दादां’च्या निधनाने डोंबिवलीवर शोककळा
डोंबिवली, ता. २८ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी धडकली आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. या धक्क्यातून डोंबिवलीकरही सावरलेले नाहीत. विशेषतः मिलापनगरमधील रहिवाशांसाठी ही बातमी अत्यंत वेदनादायी ठरली आहे. वर्षभरापूर्वीच मिलापनगरवासीयांनी बारामतीची अभ्यास सहल केली होती. त्या आठवणींना उजाळा देताना आज अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
बुधवारची सकाळ उजाडली तीच एका काळजाचा ठोका चुकवणाऱ्या बातमीने. दादांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच विश्वास बसत नव्हता, अशा भावना मिलापनगरचे रहिवासी राजू नलावडे यांनी व्यक्त केल्या. वर्षभरापूर्वी १ आणि २ फेब्रुवारी २०२५ रोजी मिलापनगरवासीयांनी बारामतीचा दौरा केला होता. या सहलीसाठी बनवलेल्या सोशल मीडिया ग्रुपवर आज केवळ दादांच्या आठवणी आणि श्रद्धांजलीचे संदेश फिरत आहेत.
मिलापनगरचे रहिवासी आणि बारामतीचे सुपुत्र भारत तावरे (उद्योजक व शेतकरी) यांच्या पुढाकारातून ही सहल आयोजित करण्यात आली होती. या दौऱ्यात रहिवाशांनी काय अनुभवले, याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. १२० एकरांवरील कृषी विज्ञान केंद्र आणि तेथील गेस्ट हाउसमध्ये केलेला दोन दिवसांचा मुक्काम रहिवाशांच्या स्मरणात आहे. पवार कुटुंबाचे मूळ निवासस्थान असलेल्या ‘गोविंद बागे’ला रहिवाशांनी भेट दिली होती. तेथील गोठ्यातील दूध आजही शरद पवारांच्या घरी जाते, ही कर्मचाऱ्याने सांगितलेली माहिती नलावडे यांनी आवर्जून आठवली.
नियोजनबद्ध शहर
विद्या प्रतिष्ठानचे भव्य शैक्षणिक संकुल, साखर कारखाने, विमानतळ आणि चकाचक रस्ते पाहून ‘‘एका नेतृत्वाखाली शहराचा असा कायापालट कसा होऊ शकतो,’’ याचे नवल सर्वांना वाटले होते.
प्रशासकीय शिस्तीचा धडा
असाच विकास आपल्या कल्याण-डोंबिवलीत का होऊ शकत नाही, हा प्रश्न तेव्हाही त्यांच्या मनात होता आणि आज दादांच्या जाण्याने तो अधिकच गडद झाला आहे. अजितदादांची निर्णयक्षमता आणि बारामतीचे मॉडेल हे मिलापनगरवासियांसाठी विकासाची दिशा दाखवणारे ठरले होते. आज मिलापनगरच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर त्या सहलीतील फोटो शेअर केले जात आहेत. ‘‘विकासपुरुष हरपला’’ अशा शब्दांत मिलापनगरवासी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.