आश्वासनांनंतर आता अंमलबजावणीची ‘कसोटी’
वाशी, ता. २८ (बातमीदार) : नुकत्याच झालेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी तसेच त्यांच्या प्रचारासाठी आलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नागरिकांसमोर मोठमोठी आश्वासने दिली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपची एकहाती सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नागरिकांचे लक्ष आश्वासनांच्या पूर्ततेकडे लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक २०२०मध्ये कोरोनामुळे लांबणीवर पडली आणि प्रशासकीय राजवट लागू झाली. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी थेट महापालिका प्रशासन, अधिकारी आणि क्षेत्रीय कार्यालयांवर आली. शहरातील अनेक समस्या प्रलंबित असूनही त्या सोडविण्यात प्रशासनाला अपेक्षित यश मिळाले नाही. सुमारे साडेपाच वर्षांनंतर महापालिका निवडणूक जाहीर झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, आजही शहरातील अनेक भागांत मूलभूत सुविधा कायम आहेत. अनियमित पाणीपुरवठा, खराब व खड्डेमय रस्ते, वाढती कोंडी तसेच कचरा व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे नागरिक त्रस्त आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कामांमधून दिसावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सत्ताधारी पक्षाला आता वेळेत निर्णय घेऊन कामे पूर्ण करावी लागणार आहेत अन्यथा आगामी काळात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक कारभार, नियमित आढावा बैठकांद्वारे कामांचा पाठपुरावा आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यामुळे जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण होतात की ती पुन्हा एकदा निवडणूक घोषणाच ठरतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
विजयी भाजपची प्रमुख आश्वासने
२० वर्षे करवाढ होऊ देणार नाही. मालमत्ता करमाफीसाठी पाठपुरावा करणार. तलावांतील गाळ काढून स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शंभर बेडचा आयसीयू कक्ष सुरू करणार, महापे-तुर्भे-घणसोली येथे सार्वजनिक रुग्णालय व आरोग्य केंद्राची उभारणी करणार. झोपडपट्टी परिसरात फिरत्या दवाखान्याची निर्मिती करणार. प्रत्येक नोडमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा उभारणार. महापालिका शाळांमधून केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण देणार. प्रकल्पग्रस्तांची सर्व बांधकामे जमिनीच्या मालकी हक्काने नियमित करणार. झोपडपट्टी विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा उभारणार. झोपडपट्टी पुनर्विकासाला चालना देणार. भिकारीमुक्त शहर संकल्पना राबविणार. सिडको आकारत असलेले ट्रान्स्फर चार्जेस रद्द करणार.
निवडणुकीत विविध पक्षांचे नेते व उमेदवारांनी अनेक आश्वासने दिली. आता नागरिकांना परिणाम दिसायला हवेत. उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यातून विकासकामे करण्याचे वचन नागरिकांना दिले. त्यावर विश्वास ठेवून उमेदवारांना निवडून दिले. आता नगरसेवकांनी आश्वासने पूर्ण केली पाहिजेत.
- अनुप आचरेकर, नागरिक
जाहीरनामा फक्त कागदावर न राहता प्रत्यक्ष अमलात यावा, ही अपेक्षा आहे. नागरिकांना प्राथमिक सुविधा वेळेत हव्यात. त्या तातडीने पुरवाव्यात. त्याची अंमलबजावणी कधी होते, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
- सचिन पाटील, नागरिक

