चिन्हांचे वाटप होताच रणधुमाळीला जोर
उरण, ता. २८ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषद आणि उरण पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या अधिकृत चिन्हांचे वाटप करण्यात आले असून, आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध निवडणूक विभागांतून दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये नवघर गटातून शिवसेना ठाकरे गटाच्या प्रेरणा कुणाल पाटील, भाजपच्या प्रभावती राजाराम भोईर आणि वंचित बहुजन आघाडीच्या सोनाली तुषार गायकवाड या प्रमुख उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. जासई गटातून जे. डी. जोशी (भाजप), डॉ. मनीष अनंत पाटील (काँग्रेस) आणि संतोष दत्तू भालेकर (अपक्ष) हे नशीब अजमावत आहेत. चाणजे गटातून सिद्धी सागर कडू (शिवसेना ठाकरे गट), रिना जितेंद्र घरत (भाजप) आणि मालती संतोष भगत (आम आदमी पार्टी) निवडणूक लढवत आहेत. चिरनेर गटातून या विभागात ॲड. अविनाश विजय ठाकूर (काँग्रेस) आणि देवेंद्र विनायक पाटील (भाजप) यांच्यासह संतोष भगत, अविनाश पाटील हे दोन अपक्ष आणि राष्ट्रवादी अजित गटातून रत्नाकर म्हात्रे हे रिंगणात आहेत.
पंचायत समितीसाठीदेखील प्रत्येक गणात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. भेंडखळ गणातून कुंदा भूषण पाटील (माकप), मिलिंद पाटील (भाजप), दीपक भोईर (शिवसेना ठाकरे गट), भावेश भोईर (शिवसेना) असे एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत. नवघर गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ॲड. रजनीकांत गणेश पाटील, भाजपचे हरेश भोईर आणि शिवसेना ठाकरे गटाचे परेश ठाकूर यांच्यात लढत होईल.
जासई गणातून भाजपच्या मनीषा घरत आणि शेकापच्या निर्मला घरत यांच्यात थेट लढत रंगणार आहे. चिर्ले गणातून जोत्स्ना पाटील (भाजप) आणि प्रियांका दीपक मढवी यांच्यात थेट लढत होणार आहे. केगाव गणातून राष्ट्रवादीचे परीक्षित ठाकूर, भाजपचे राजेंद्र ठाकूर आणि शेकापचे महेश म्हात्रे निवडणूक रिंगणात आहेत. चाणजे गणातून भाजपचे कैलास भोईर, शिवसेनेचे अक्षय म्हात्रे आणि शेकापचे ॲड. सागर कडू यांच्यात सामना होणार आहे. चिरनेर गणातून महाविकास आघाडीच्या कविता पाटील आणि भाजपच्या साक्षी पाटील, तर आवरे गणातून भाजपच्या समिधा म्हात्रे, शेकाप आघाडीच्या प्रारंभी गावंड आणि मनसेच्या सुषमा गावंड यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
प्रचाराला सुरुवात
उरण तालुक्यात महाविकास आघाडी, महायुती आणि शेकाप अशा विविध पक्षांच्या उपस्थितीमुळे यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार असल्याचे चिन्हांच्या वाटपानंतर स्पष्ट झाले आहे. सर्वच उमेदवारांनी आता गावागावात प्रचाराला सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

