मराठी शाळा संवर्धनासाठी रायते पॅटर्न

मराठी शाळा संवर्धनासाठी रायते पॅटर्न

Published on

मराठी शाळा संवर्धनासाठी रायते पॅटर्न
रायते जिल्हा परिषद शाळेचा लढा राज्याला दिशा देणारा
अजय शेलार : सकाळ वृत्तसेवा
टिटवाळा, ता. २८ : महाराष्ट्रातील मराठी शाळांचे अस्तित्व आज गंभीर संकटात आहे. इंग्रजी माध्यमाचे आकर्षण आणि खासगी शाळांच्या झगमगाटामुळे मराठी शाळांचा गळा घोटला जात असताना, कल्याण तालुक्यातील रायते गावाने एक ऐतिहासिक आदर्श निर्माण केला आहे. ११३ वर्षे जुनी ही जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी ग्रामपंचायतीने ‘प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्षभराची घरपट्टी माफ’ करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

राज्यात सध्या मराठी शिक्षणाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. समोर आलेली आकडेवारी मन सुन्न करणारी आहे. १४,७८३ मराठी शाळा सध्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. २,५०० हून अधिक शाळांमध्ये पटसंख्या १० पेक्षा कमी असल्याने त्या थेट बंद होण्याच्या स्थितीत आहेत. कोकण विभागात ७०० हून अधिक शाळा संकटात (ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांचा समावेश) आहेत, तर विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी ७०० ते ८०० शाळा धोक्याच्या छायेत आहेत.

११३ वर्षांचा वारसा जपण्याचा संकल्प
१९१३ मध्ये स्थापन झालेली रायते येथील शाळा केवळ इमारत नाही, तर गावाची ओळख आहे. जेव्हा विद्यार्थीसंख्या घटू लागली, तेव्हा ग्रामस्थ, शिक्षक आणि ग्रामपंचायतीने ‘शाळा वाचवायचीच’ असा सामूहिक निर्धार केला. केवळ आर्थिक सवलत न देता, शाळेची गुणवत्ता सुधारण्यावरही भर देण्यात आला.

शाळेची सद्यस्थिती
सध्या या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून, मराठी व सेमी-इंग्लिश अशा दोन्ही माध्यमांतून शिक्षण दिले जाते. ७५ विद्यार्थ्यांची ही संख्या शंभरी पार नेण्यासाठी मुख्याध्यापिका चित्रा बोंडे आणि त्यांचे सहकारी शिक्षक पालकांशी थेट संवाद साधून मराठी माध्यमाचे महत्त्व पटवून देत आहेत. हाच उपक्रम शेजारील पिंपळोली गावातील शाळेसाठीही राबवण्यात येत आहे.

अस्मितेची लढाई
मराठी शाळा बंद होणे म्हणजे केवळ एक वास्तू बंद होणे नाही, तर एका पिढीचा सांस्कृतिक वारसा नष्ट होणे आहे. जिथे व्यवस्था हतबल होते, तिथे समाज पुढाकार घेतो, हे रायते गावाने सिद्ध केले आहे. रायतेची ही ‘आशेची ज्योत’ राज्यातील हजारो शाळांसाठी प्रेरणेची मशाल ठरू शकते.

मराठी शाळा वाचवणे म्हणजे आमची संस्कृती आणि भविष्य वाचवणे आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढावी आणि पालकांचा विश्वास सार्थ ठरावा, यासाठीच आम्ही घरपट्टी माफीचा निर्णय घेतला आहे. हा केवळ प्रयत्न नसून आमचा ठाम संकल्प आहे.
- समिता संतोष सुरोशी (सरपंच, रायते-पिपळोली ग्रुप ग्रामपंचायत)

रायते गावातील जिल्हा परिषद शाळेत सध्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून, मराठी व सेमी-इंग्लिश या दोन्ही माध्यमांतून शिक्षण दिले जाते. आज या शाळेत अवघे ७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; मात्र ही संख्या वाढावी, शाळा बळकट व्हावी आणि भविष्यात ती बंद पडण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचू नये, यासाठी ग्रामस्थ आणि स्थानिक शिक्षकांनी एकत्र येत सक्रिय पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, सुविधा आणि पालकांशी थेट संवाद यावर भर देत शाळेचा विश्वास पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- चित्रा बोंडे, मुख्यध्यापिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com