

महापौर निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट
अजितदादांच्या निधनामुळे निवडणूक लांबणीवर पडणार?
सकाळ वृत्तसेवा
ठाणे ता. २८ : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर अवघ्या शहराचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील धक्कादायक निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. परिणामी, येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणारी महापौर निवडणूक लांबणीवर पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने येथे शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. यंदा महापौरपद ‘अनुसूचित जाती’ प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने शिंदे गटातून सात इच्छुकांची नावे शर्यतीत आहेत. पक्षाच्या पडत्या काळात शिंदेंना साथ देणाऱ्या कोणत्या निष्ठावंताच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजितदादांच्या निधनामुळे घोषित शासकीय दुखवट्यात कोणतेही सार्वजनिक उत्सव किंवा शासकीय कार्यक्रम पार पडत नाहीत. यामुळे ३० जानेवारीची अर्ज भरण्याची मुदत आणि ३ फेब्रुवारीची निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते. तथापि, प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाकडून अद्याप लेखी निर्देश प्राप्त झालेले नाहीत. आदेश आल्यास ही निवडणूक त्वरित लांबणीवर टाकली जाईल, अन्यथा प्रक्रिया पूर्वनियोजित वेळेतच पूर्ण केली जाईल. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत निवडणुका आणि राजकीय पेच बाजूला ठेवून प्रशासन शासकीय दुखवट्याच्या नियमावलीची प्रतीक्षा करत आहे.
निवडणुकीचे गणित आणि वेळापत्रक
मतदान प्रक्रिया : १५ जानेवारी रोजी पार पडली.
निकालाचे चित्र : शिवसेना (शिंदे गट) ७५ जागांसह बहुमतात.
नियोजित निवडणूक : ३ फेब्रुवारी
अर्ज भरण्याची मुदत : ३० जानेवारी (सकाळी ११ ते सायंकाळी ५.३०).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.