महापौर पदाच्या इच्छुकांना धाकधूक
महापौर पदाच्या इच्छुकांमध्ये धाकधूक
हितेंद्र ठाकूर यांचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
वसई ता. २८ (बातमीदार) : महापालिकेच्या निवडणूका पार पडल्या. महापौरपदासाठी आरक्षणही जाहीर झाले, पण राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महापौर पदाचा मान कोण मिळवणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. असेच काहीसे वातावरण वसई-विरार महापालिकेतही निर्माण झाले आहे. अशात बहुजन विकास आघाडी (बविआ)चे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी महापौरपदासाठी काही जणांची नावे जाहीर केल्यानंतर इच्छुकांमधील धाकधूक मात्र वाढली आहे.
सध्या वसई-विरार महापालिका महापौरपदाच्या शर्यतीत स्थायी समितीचे माजी सभापती अजीव पाटील व भाजपमधून बविआमध्ये आलेले नगरसेवक शेखर धुरी यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. असे असले तरी ठाकूर यांनी आपला निर्णय बंद मुठीत ठेवल्याने त्याचे उत्तर थेट ३ फेब्रुवारीलाच मिळणार, असे सांगितले जात आहे. शहरात भाजपची लाट असतानादेखील बविआने विजयश्री खेचून आणली. अनुभवी व नवे चेहरे आता वसई-विरार पालिकेचा गाडा हाकणार आहेत. दुसरीकडे फोडाफोडींच्या राजकारणावर भाष्य करताना हितेंद्र ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक महत्त्वाचे वक्तव्य केले. महापौरपदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे असून, या वेळी त्यांनी काही नावांचा उल्लेखही केला. ठाकूर यांच्या याच वक्तव्यामुळे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांमध्ये धाकधूक वाढली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, अजीव पाटील हे संयमी, कर्तृत्वान आणि नेतृत्व करण्याची ताकद असणारे नेते असल्याने त्यांच्या नावाला नागरिकांमधून अधिक पसंती आहे, तर भाजपमधून आलेले शेखर धुरी हेदेखील अनुभवी असून विरोधी बाकावर बसणाऱ्या महायुतीला जसास तसे उत्तर देण्यासाठी धुरीच महापौर व्हावेत, असेदेखील बोलले जात आहे.
----------------
चौकट
अनेक नावांची चर्चा सुरू
शहरात अनेक नावांची चर्चा सुरू असली, तरी हितेंद्र ठाकूर हे नेहमी राजकारणातील हुकूमी पत्ता शेवटच्या टप्प्यात समोर आणतात अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे या पत्त्यांमधला हुकूमी एक्का कोण, याचे उत्तर येत्या ३ फेब्रुवारीलाच कळेल. तसेच शेखर धुरी हे भाजपमध्ये अनेक वर्षे कार्यरत होते आणि तिकीट न मिळाल्याने नाराज होत त्यांनी थेट बविआकडून निवडणूक लढवली व यशही संपादन केले. अशात हितेंद्र ठाकूर यांनी महापौरपदाच्या शर्यतीतील नावांमध्ये धुरी यांच्या नावाचा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या.
--------------
पाटील यांचा दांडगा जनसंपर्क
अजीव पाटील यांनी तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीवर सभापती म्हणून यापूर्वी काम केले आहे. ते बविआचे संघटक सचिव आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून विरोधकांशीदेखील त्यांचा चांगला संवाद आहे. त्यामुळे अजीव पाटील यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

