यंदाच्या निवडणुकीत तीनच गटांची नोंद

यंदाच्या निवडणुकीत तीनच गटांची नोंद

Published on

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २८ : उल्हासनगर महापालिकेच्या स्थापनेपासून आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत तीनपेक्षा अधिक गटांची नोंद होत आली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच केवळ शिवसेना, भाजप आणि काँग्रेस या तीनच पक्षांचे अधिकृत गट नोंदणीकृत झाले आहेत. सात राजकीय पक्षांना एकही जागा न मिळाल्याने त्यांचे खाते निरंक राहिले असून, ही बाब शहराच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे.
कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नोंद झालेल्या गटांमध्ये शिवसेना (गटनेते अरुण आशान), भाजप (गटनेते राजेश वधारिया) आणि काँग्रेस (गटनेत्या अंजली साळवे) यांचा समावेश आहे. या तिन्ही गटनेत्यांना उल्हासनगर महापालिका मुख्यालयात स्वतंत्र दालने मिळणार आहेत. शिवसेनेने एकूण ४० नगरसेवकांची नोंद केली असून, त्यामध्ये शिवसेनेचे ३६, वंचित बहुजन आघाडीचे दोन, साईपक्षाचा एक व एक अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे शहराध्यक्ष नाना बागुल हे शिवसेनेतून निवडून आल्याने आठवले गटालाही स्वतंत्र गट स्थापता आलेला नाही. वंचित व साई पक्ष शिवसेनेच्या गटात सहभागी झाल्यामुळे त्यांच्या स्वतंत्र दालनांवरही पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.
यापूर्वी महापालिकेत अखंड शिवसेना, भाजप, उल्हासनगर पिपल्स पार्टी, काँग्रेस, अखंड राष्ट्रवादी काँग्रेस, साई पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले व गवई गट), मनसे, पीआरपी कवाडे गट; भारिप बहुजन महासंघ या पक्षांनी विविध निवडणुकांमध्ये गटनेतेपद भूषविले होते. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेत आगामी काळात शिवसेना, भाजप आणि काँग्रेस हे तीनच गट कार्यरत राहणार असून शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे.

चुरशीची लढत
अखंड शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट व मनसे युतीने निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. पॅनल क्रमांक १४ मध्ये ठाकरे गटाने शिवसेनेला चुरशीची लढत दिली होती.

दोन्ही राष्ट्रवादी निरंक
२०१७ च्या निवडणुकीत पॅनल १७ मधून अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही नगरसेवक निवडून आले होते. मात्र, यंदा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीसह दोन्ही राष्ट्रवादी गटांना एकही जागा मिळालेली नाही. तसेच पीआरपी, रिपब्लिकन सेना यांसारखे पक्षही निरंक राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com