पनवेल तालुक्यात निवडणुकीचा महासंग्राम
पनवेल, ता. २९ (बातमीदार) : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून अनेक गट व गणांमध्ये दुरंगी, तिरंगी, तसेच चौरंगी लढती होत असल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी १८, तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ४६ असे एकूण ६४ उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत.
रायगड जिल्हा परिषदेत पनवेल तालुक्यातील जागांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उलवा, करंजाडे व सुकापूर येथील नव्या वसाहतींमधील शहरी मतदारांसह पारंपरिक ग्रामीण मतदारसंख्या या निवडणुकीचा निकाल ठरवणार आहे. बहुसंख्य ठिकाणी भाजपचे कमळ विरुद्ध शेकापचा खटारा अशी थेट टक्कर पाहायला मिळत आहे. शहरी मतदारसंख्येत झालेली वाढ आणि ग्रामीण प्रश्नांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
सहा गटांमध्ये दुरंगी लढत
जिल्हा परिषदेच्या वावंजे, नेरे, पाली देवद, पळस्पे, वडघर व केळवणे या सहा गटांमध्ये भाजप व शेकाप यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. वावेघर गटात भाजप विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात थेट सामना रंगणार आहे. गव्हाण गटात महाविकास आघाडीतील बिघाडी स्पष्ट दिसून येत असून मनसेने उमेदवार दिल्याने येथे भाजप, शेकाप, मनसे व अपक्ष असे चार उमेदवार रिंगणात आहेत.
चार गणांमध्ये मैत्रीपूर्ण लढती
शेकापने जिल्हा परिषदेच्या आठपैकी सहा जागांवर उमेदवार उभे केले असून भाजपने महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या गटात एकही जागा न दिल्याचे चित्र आहे. मात्र पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) आपटा, वहाळ, करंजाडे व पळस्पे या चार गणांमध्ये उमेदवार देत मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत.
मतांचे विभाजन होण्याची शक्यता
पळस्पे पंचायत समिती गणामध्ये महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला संधी दिल्याने तेथे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करंजाडे गणामध्ये शेकाप व काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार नशीब आजमावत आहेत. वहाळ गणात महायुतीतील तिन्ही पक्ष आमनेसामने असल्याने महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.
सात गणांमध्ये दुरंगी
पंचायत समितीच्या एकूण १६ गणांपैकी नेरे, आदई, विचुंबे, कोन, वावेघर, वडघर व केळवणे या सात गणांमध्ये दुरंगी लढत होत आहे. आपटा, गव्हाण, करंजाडे, पोयंजे, पळस्पे व चिंध्रण या सहा गणांमध्ये तिरंगी लढत असून पाली देवद येथे चौरंगी सामना होणार आहे. वावंजे व वहाळ या दोन गणांमध्ये प्रत्येकी पाच उमेदवार एका जागेसाठी रिंगणात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

