अखेरच्या प्रवासात आई-बहिणीचा आक्रोश

अखेरच्या प्रवासात आई-बहिणीचा आक्रोश

Published on

अखेरच्या प्रवासात आई-बहिणीचा आक्रोश
पिंकी मालीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अटेंडंट पिंकी माली हिच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. २९) दुपारी दादरच्या शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लेकीचा मृतदेह पाहताच आई आणि बहिणीचा आक्रोश हादरवणारा होता. वडील, पतीसह संपूर्ण कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. माली कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पिंकीचे वडील शिवकुमार माली बुधवारी बारामतीला जाऊन स्वतः लेकीच्या मृतदेहाची ओळख पटवून आले. त्यानंतर गुरुवारी दुपारी सुमारे १२.१५ वाजता पिंकीचे पार्थिव प्रभादेवी येथील सेंच्युरी म्हाडा इमारतीखाली तिच्या राहत्या घरी आणण्यात आले. सकाळपासूनच माली कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी आणि परिचितांनी पार्थिव दर्शनासाठी गर्दी केली होती. रुग्णवाहिकेतून पार्थिव खाली उतरवल्यानंतर पिंकीच्या आई-बहिणींनी हंबरडा फोडला. तो क्षण पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. अंत्यदर्शनानंतर दुपारी सुमारे १.३० वाजता पिंकीची अंत्ययात्रा शिवाजी पार्कच्या दिशेने निघाली. वडील शिवकुमार, पती सोमविकार सैनी आणि भाऊ यांनी अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले.
...
सर्वांची आधारवड
पिंकी अतिशय सक्रिय, प्रेमळ आणि मनमिळाऊ होती, असे शेजारी भावुक होत होते. एकदा स्वतःच्या पायाला जखम झाली असतानाही आईची प्रकृती बिघडल्याने ती स्वतःचे दुखणे विसरून आईला डॉक्टरांकडे घेऊन गेली होती. घरात कोणी आजारी पडले की पिंकी सर्वांत आधी धावून जायची. वडील शिवकुमार पूर्वी सेंच्युरी मिलमध्ये कार्यरत होते. सध्या ते टॅक्सीचालक म्हणून काम करतात. त्यामुळे घराची मोठी आर्थिक जबाबदारी पिंकीच सांभाळत होती, असे सांगण्यात आले.
...
संसाराचे स्वप्न अपूर्ण
पिंकीचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पती सोमविकार सैनी आणि पिंकी यांनी नुकतेच बाजूच्या इमारतीत नवीन घर घेतले होते. दोघेही नव्या घरात शिफ्ट झाले होते. घराचे फर्निचरही पिंकीच्या आवडीनिवडी जपत सुरू होते. पिंकीच्या जाण्याने अवघ्या दोन वर्षांची लग्नगाठ तुटली आणि नव्या घरात सुखी संसार फुलवण्याचे स्वप्न कायमचे अपूर्ण राहिले.
...
क्रू-मेंबर मैत्रिणींना अश्रू अनावर
पिंकी आमची केवळ सहकारी नव्हे, तर खूप चांगली मैत्रीण होती. ती माणूस म्हणूनही खूप चांगली होती. अत्यंत सक्रिय होती. आईच्या आजारपणातही ती खूप काळजी घ्यायची, असे पिंकीच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या तिच्या क्रू-मेंबर मैत्रिणींनी साश्रूनयनांनी सांगितले.
...
आजी-माजी नगरसेवकांकडून सांत्वन
या दुःखाच्या प्रसंगी माली कुटुंबीयांना स्थानिक नेते, शाखाप्रमुख आणि नगरसेवकांनी भेट देत धीर दिला. नवनिर्वाचित नगरसेवक निशिकांत शिंदे यांनी माली कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच शिंदे गटाचे समाधान सरवणकर यांनी कुटुंबाशी संवाद साधत सांत्वन केले. ठाकरे गटाचे सुनील शिंदे यांनीही माली कुटुंबाला आधार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com