वाहन चाचणी केंद्राला विलंब
बेलापूर, ता. २९ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर १९-ए येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) वाहन चाचणी केंद्र म्हणजेच एटीएस (ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन) अद्याप कार्यान्वित करण्यात आलेले नाही. मागील अनेक महिन्यांपासून सुरू असणाऱ्या या यंत्रणेचे कामकाज पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दोन महिने लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परिणामी या नव्या यंत्रणेद्वारे वाहतुकीच्या वाहनांच्या फिटनेस, पासिंग प्रक्रियेसाठी आणखी विलंब लागणार आहे.
शहरातील वाहन चाचणी केंद्रे जागेअभावी बंद झाली होती. नेरूळ सेक्टर १९ ए येथे सुरू असणाऱ्या तात्पुरत्या वाहतुकीच्या वाहनांच्या पासिंग प्रक्रियेत पारदर्शकता यावी, तसेच कमी मनुष्यबळात वाहनांची फिटनेस, पासिंग प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी मागील काही महिन्यांपासून एटीएस सेंटर उभारण्याचे कामकाज सुरू आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे अद्याप हे काम पूर्ण होऊ शकले नाही. दरम्यान, याच ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मोटार वाहन निरीक्षक कक्ष, वाहन तपासणी तळ सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी वाहतूक वाहनांची पासिंग करण्यात येत आहे. मधल्या काळात हे पासिंगदेखील बंद झाल्याचे वाहनचालक मालकांकडून सांगण्यात आले. परिणामी वाशी, नेरूळपर्यंत फेऱ्या वाहनचालकांना मारण्याची वेळ येत आहे, मात्र लवकरच हे केंद्र सुरू होत असल्याने या ठिकाणी सर्व कारभार सुरू होण्याची शक्यता वाहतूक अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
लवकरच केंद्र सुरू
तीन निरीक्षकांमार्फत दिवसाला साधारण ८० ते १०० वाहतूक वाहने पासिंग केली जात आहेत. एटीएस यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. नवी मुंबईतील केंद्राचे काम वेगाने सुरू असून, लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी दिली.
एटीएस यंत्रणेचे फायदे
- मानवी हस्तक्षेप कमी असल्याने पारदर्शक वाहन तपासणी.
- वाहन तपासणी वेगाने होणार असल्याने वेळेची बचत.
- मशीनद्वारे ब्रेक, सस्पेंशन, लाइट यांची इत्थंभूत तपासणी होणार.
- एटीएसद्वारे मिळणारे प्रमाणपत्राची संपूर्ण भारतात मान्यता.

