डोंबिवलीतील बेकायदा चाळी पाडण्याचे आदेश

डोंबिवलीतील बेकायदा चाळी पाडण्याचे आदेश

Published on

बेकायदा चाळींवर कारवाईचे आदेश
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचा संताप
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : डोंबिवली पश्चिमेकडील कोपर खाडीकिनारा आणि देवीचापाडा परिसरात उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळींवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी संताप व्यक्त केला आहे. आयुक्तांनी ‘ह’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना या अनधिकृत चाळी तातडीने जमीनदोस्त करण्याचे फेरआदेश दिले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील कोपर खाडीकिनाऱ्यावरील देवीचापाडा परिसरात उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळी तोडण्याचे आदेश देऊनही कारवाई न झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांना पुन्हा एकदा आदेश द्यावे लागले आहेत. गेल्या २० दिवसांपूर्वीच आयुक्त गोयल यांनी ‘ह’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना या बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

पालिका प्रशासनाकडून बेकायदा चाळींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत एका तक्रारदाराने मंगळवारपासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची दखल घेत आयुक्त गोयल यांनी मंगळवारी सायंकाळी ‘ह’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना देवीचापाडा स्मशानभूमी, गणपती विसर्जन तलाव, मेंग्या आजो मंदिर, अनमोलनगर परिसर तसेच कोपर म्हाळसाई चाळ परिसरात खाडी बुजवून व कांदळवन नष्ट करून उभारलेल्या सर्व बेकायदा चाळी तातडीने जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले.

राजकीय पाठबळ?
आयुक्तांचे आदेश असूनही कारवाई होत नसल्याने भूमाफियांना राजकीय पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. गेल्या महिनाभरात देवीचापाडा व कोपर परिसरात सुमारे ६० ते ७० बेकायदा चाळी उभारण्यात आल्याचे बोलले जात आहे. या चाळीवर कारवाई होणार नाही, असे राजकीय पदाधिकारी सांगतात. दरम्यान, आयुक्त गोयल यांचे आदेश धुडकावल्याचा ठपका ठेवत ‘ह’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना ही तातडीने निलंबित करण्याची मागणी तक्रारदारांकडून जोर धरू लागली आहे. आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसलेले तक्रारदार कल्पेश जोशी यांनीही सहाय्यक आयुक्त सावंत यांच्या निलंबनाची मागणी राज्याच्या नगरविकास विभागाकडे केली आहे.

तडकाफडकी निलंबन
टिटवाळा येथे दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका सहाय्यक आयुक्ताने भूमाफियांना बेकायदा चाळी उभारण्यासाठी पाठबळ दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या वेळी तत्कालीन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी संबंधित सहाय्यक आयुक्ताला तडकाफडकी निलंबित केले होते. मात्र, आजही टिटवाळा परिसरात बेकायदा बांधकामे सुरूच असून, विद्यमान अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com