ठाणे महापालिका कलावंत जपणारी

ठाणे महापालिका कलावंत जपणारी

Published on

ठाणे महापालिका कलावंत जपणारी
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : पालिकेच्या सेवेतील कर्मचारी अधिकारी हेसुद्धा चांगले लेखक, गायक, कवी आहेत. ठाणे महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करीत आली आहे. कलावंत आणि कला जपणारी महापालिका असा ठाणे महापालिकेचा नावलौकिक आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले.
ठाणे महापालिकेतर्फे मराठी भाषा पंधरवड्यानिमित्ताने विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच शृंखलेतील कविसंमेलन मंगळवारी (ता. २७) नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडले. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचे स्वागत केले. गझलकार सुनील तांबे यांच्यासह कवींनी एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कधी प्रेम, कधी उपहासात्मक वर्तमानावर बोट ठेवत, कधी व्यथा, वेदना, जीवन संघर्ष, जीवनातील शाश्वत सत्य तर कधी नर्म विनोद अशा मानवी भावभावनांचा अविष्कार असणाऱ्या कविता या निमित्ताने या कवींनी सादर केल्या.
गझल, हायकू, मुक्त छंद, वृत्तबध्द आणि चार ओळी असे कवितेचे विविध प्रकार हाताळणाऱ्या या कवींनी कवितेचा समृद्ध इतिहास या निमित्ताने उलघडून दाखवला. गिरणगावातील कामगारांचा आवाज असलेल्या नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांचे स्मरण करून आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हे कवी संमेलन झाले. प्रशांत डिंगणकर यांनी सादर केलेली ‘बा विठ्ठला’ कविता, यामिनी दळवी यांनी सादर केलेली सुखाला आज माहेरी पुन्हा परतायला सांगू ही गझल तर हार नाही जीत नाही, श्वास या सुनील तांबे यांच्या तरनुम्ममधील गझल उपस्थितांची दाद मिळवून गेल्या. पंकज दळवी यांच्या नर्म विनोदी कवितांमुळे सभागृह हशा आणि टाळ्यात भरून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com