अनधिकृत पानटपऱ्यांचा सुळसुळाट
अनधिकृत पानटपऱ्यांचा सुळसुळाट
सिगारेट-दारू, गर्दीमुळे परिसर असुरक्षित; महापालिकेकडे तातडीची तक्रार
तुर्भे, ता. २९ (बातमीदार) : जुईनगर येथील चिंचोली तलावासमोरील अपंग नागरिकांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अनधिकृत पानटपऱ्या उभारल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री, रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांची वर्दळ आणि सततची गर्दी यामुळे येथे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, या गैरप्रकारांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे तातडीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अपंग नागरिकांच्या सुविधांसाठी राखीव असलेली ही जागा काही व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवसायासाठी ताब्यात घेतल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या पानटपऱ्यांमुळे युवक व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी येथे जमत असून, आसपासच्या रहिवासी इमारतींतील नागरिकांना सिगारेटच्या धुराचा व आवाजाचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, वृद्ध आणि श्वसनविकारग्रस्त रुग्णांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अपंगांसाठी राखीव जागेचा गैरवापर
रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांची वर्दळ वाढल्याने महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असामाजिक वर्तनाच्या घटनाही घडत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अपंगांसाठी राखीव असलेली सार्वजनिक जागा अशा प्रकारे गैरवापरासाठी वापरली जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तातडीच्या कारवाईची मागणी
आरोग्यसेवक व राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्षाचे कार्यकर्ते अजय मोरे यांनी महापालिकेकडे सविस्तर तक्रार करून अनधिकृत पानटपऱ्या तत्काळ हटवण्याची, भूखंड मुक्त करण्याची आणि परिसरात नियमित गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. आता महापालिका या प्रकरणात काय कारवाई करते, याकडे जुईनगरवासीयांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

