डोंबिवलीत डम्परखाली चिरडून महिलेचा मृत्यू
डोंबिवलीत डम्परखाली चिरडून महिलेचा मृत्यू
वाहनाकडे आरटीओचे सक्षमता प्रमाणपत्रच नव्हते
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ ः डोंबिवली पश्चिमेत एमएमआरडीएच्या निधीतून सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामात वापरण्यात येणाऱ्या डम्परखाली येऊन एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी गोपीनाथ चौकात घडली. विशेष म्हणजे, या अपघातास कारणीभूत ठरलेल्या डम्परकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) आवश्यक सक्षमता प्रमाणपत्र नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या अपघातात नम्रता नारायण साळवी (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात डम्परचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगर परिसरात एमएमआरडीएच्या ठेकेदारामार्फत सिमेंट काँक्रीट रस्ते व गटारांची कामे सुरू आहेत. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रक व डम्परचा वापर केला जात आहे. गुरुवारी सकाळी गोपीनाथ चौक परिसरात डम्पर गोपीनाथ चौकाच्या दिशेने वळणावरून जात असताना हा अपघात घडला. नम्रता साळवी आपल्या नातेवाइकाच्या दुचाकीवर मागे बसल्या होत्या. वळणावर डम्परचा दुचाकीला धक्का लागल्याने नम्रता साळवी दुचाकीवरून खाली पडल्या आणि थेट डम्परच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त जमावाकडून मारहाण होण्याच्या भीतीने डम्परचालक वाहन जागेवर सोडून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवला आहे.
विनापरवान्याची वाहने रस्त्यावर धावतात कशी?
या अपघातानंतर करण्यात आलेल्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित डम्परची नोंदणी डिसेंबर २०१९ मध्ये कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली होती. मात्र, वाहनाचा विमा २९ नोव्हेंबर २०२३ मध्ये संपला आहे. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र १२ डिसेंबर २०२२ मध्ये कालबाह्य, तर अत्यावश्यक असलेले सक्षमता प्रमाणपत्र १३ डिसेंबर २०२३ मध्ये संपले असल्याचे उघड झाले आहे. अपघातप्रकरणी डम्परचालकासह संबंधित ठेकेदारावरही कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

