भिवंडीत महापौरपदासाठी घोडेबाजार होणार?

भिवंडीत महापौरपदासाठी घोडेबाजार होणार?

Published on

भिवंडी, ता. २९ (वार्ताहर) : भिवंडी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महापौरपदासाठी पुन्हा एकदा घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीत सर्वाधिक ३० नगरसेवक निवडून आणत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे, तर भाजपने २२ नगरसेवक निवडून आणले आहेत. मात्र, बहुमताच्या गणितात मोठ्या पक्षांपेक्षा छोट्या आघाड्यांचे वजन वाढल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे १२ आणि समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवकांना सोबत घेत ४८ सदस्यांची मोट बांधून भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. दुसरीकडे भाजपने शिंदे गटाच्या सेनेचे १२ नगरसेवक आणि एका अपक्षासह एकूण ३५ जणांचे समर्थन मिळवले आहे. मात्र, भाजपसाठी बहुमताचा आकडा गाठणे कठीण ठरत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी विकास आघाडीचे तीन आणि कोणार्क विकास आघाडीचे चार नगरसेवक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. भिवंडी विकास आघाडीचे माजी महापौर जावेद दळवी; तसेच कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर. पाटील यांच्या नावांची शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांना हिंदू-मुस्लिम समाजातील नगरसेवकांचा पाठिंबा असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या २० वर्षांच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या जावेद दळवी आणि विलास पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे सेना, भाजप तसेच समाजवादी पक्षातील काही नगरसेवकही जावेद दळवी यांच्या नावाला पसंती देऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा घोडेबाजार होणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

फुटीची भीती
मागील निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या १८ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई झाल्याचा अनुभव असल्याने यावेळी काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता कमी मानली जात आहे. दुसरीकडे समाजवादी अथवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) भाजपसोबत जाण्याची शक्यता धूसर आहे. समाजवादीने कोकण भवन येथे स्वतंत्र सहा नगरसेवकांचा गट नोंदवला आहे. आमदार रईस शेख यांची भूमिका सत्ता स्थापनेत निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

‘किंगमेकर’ कोण?
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि समाजवादी पक्षाच्या एकूण ३६ नगरसेवकांच्या विजयात आमदार रईस शेख यांचे योगदान मोठे असल्याने हे नगरसेवक त्यांच्या भूमिकेपासून दूर जाणार नाहीत, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी समाजवादी पक्षाचे सहा, कोणार्कचे चार आणि भिवंडी विकास आघाडीचे तीन नगरसेवक हे ‘किंगमेकर’ ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com