४ कोटींचा गंडा घालणारा आरोपी अटकेत

४ कोटींचा गंडा घालणारा आरोपी अटकेत

Published on

चार कोटींचा गंडा घालणारा अटकेत
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : गोल्ड ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून नेरूळ येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनियरकडून चार कोटी २३ हजार रुपये उकळणाऱ्या सायबर टोळीतील अट्टल गुन्हेगाराला नवी मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. कल्पेश कमलाकर शितप (वय ४७) असे त्याचे नाव असून, त्याचे जाळे १७ राज्यांमध्ये पसरल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील सायबर टोळीने नेरूळ येथे राहणाऱ्या ६८ वर्षीय सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनियरला गोल्ड ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल, असे प्रलोभन दाखवले होते. त्यांना विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले होते. मोठ्या नफ्याच्या अपेक्षेने त्यांनी चार कोटी २३ हजारांची रक्कम गुंतवली होती. मात्र सायबर टोळीने त्यांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
त्यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून ज्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले होते, त्या खात्यांचे आणि मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले असता, आरोपी ठाण्यातील चंदनवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल पाटील व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी कल्पेश शितप याला २८ जानेवारीला अटक केली.
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता, त्याचा देशातील १७ वेगवेगळ्या राज्यांमधील सायबर तक्रारींमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या आरोपीने आपल्या साथीदारांच्या मदतीने विविध बँकांमध्ये बनावट खाते उघडल्याचे व या खात्यांचा वापर फसवणुकीची रक्कम वळवण्यासाठी केला जात असल्याचे तपासात आढळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com