आरटीईला शाळांची उदासीनता
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला यंदा खासगी शाळांनी पाठ फिरवल्याची बाब समोर आली. शाळा नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देऊनही ठाणे जिल्ह्यात आरटीई प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या ६०१ शाळांपैकी फक्त ५३९ शाळांचीच अंतिम पडताळणी पूर्ण झाली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला ९ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात शाळा नोंदणी व शाळा पडताळणीची प्रक्रिया राबविण्यात आली. सुरुवातीला १९ जानेवारी ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक शाळांनी नोंदणी न केल्याने शिक्षण विभागाने दोन वेळा मुदतवाढ देत ३० जानेवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी दिली. तरीदेखील शाळांचा प्रतिसाद समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षी ठाणे जिल्ह्यात ६००हून अधिक शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्या तुलनेत यंदा सहभागात घट झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, आरटीई अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या प्रवेश जागांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. याचा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना बसण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्हा शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली यांसारख्या भागांत शाळांची पडताळणी तुलनेने समाधानकारक असली, तरी नवी मुंबई, अंबरनाथ आणि शहापूर या भागांत पात्र ठरलेल्या शाळांची संख्या कमी आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत होणारा विलंब, सरकारकडून शाळांना मिळणाऱ्या प्रतिपूर्ती शुल्काची वेळेवर अदा न होणे, तसेच काही शाळांनी अल्पसंख्याक दर्जा स्वीकारून आरटीई प्रक्रियेतून माघार घेणे, ही या उदासीनतेमागची प्रमुख कारणे असल्याचे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे.
महापालिका/तालुका अर्ज दाखल शाळा प्रवेश पात्र शाळा
ठाणे महापालिका १२६ १२६
नवी मुंबई ८८ ३१
मीरा-भाईंदर ७७ ७७
भिवंडी (महापालिका) ३४ ३४
कल्याण–डोंबिवली ७३ ७३
उल्हासनगर १३ १३
अंबरनाथ (तालुका) ६२ ६०
कल्याण ग्रामीण ४१ ४१
शहापूर २९ २६
मुरबाड १५ १५
भिवंडी ग्रामीण ४३ ४३
एकूण ६०१ ५३९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

