शैक्षणिक संस्थेचे कार्यालय आणि कर्मचारी कक्ष सील

शैक्षणिक संस्थेचे कार्यालय आणि कर्मचारी कक्ष सील

Published on

भिवंडीत पालिकेचा ‘टॅक्स’ स्ट्राइक!
हुदा इंग्लिश स्कूलसह दोन शैक्षणिक संस्थांची कार्यालये सील

भिवंडी, ता. ३१ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेने कर थकबाकीदारांविरुद्ध आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्या शहरातील दोन मोठ्या शैक्षणिक संस्थांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये शाळेचे कार्यालय, कर्मचारी कक्ष आणि संगणक कक्ष सील करण्यात आले असून, या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हुदा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (निजामपूर) या शाळेच्या मालमत्ताधारक राबिया फैसल मेमन यांच्याकडे गेल्या पाच वर्षांपासूनची १६ लाख ३४ हजार रुपयांची थकबाकी आहे. वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्य कार्यालय आणि कर्मचारी कक्ष सील करण्यात आला. तसेच अब्दुल शकूर प्राथमिक शाळा (समद नगर) भिवंडी विव्हर्स एज्युकेशन सोसायटीमार्फत चालवल्या जाणाऱ्या या शाळेकडे २५ लाख ४ हजार ५१६ रुपयांचा कर थकीत आहे. वसुली विभागाने या शाळेचा संगणक कक्ष आणि कार्यालय सील केले आहे. हुदा शाळेला थकबाकी भरण्यासाठी सात दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत रक्कम जमा न केल्यास शाळेचा पाणीपुरवठा आणि वीज कनेक्शन खंडित करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

मालमत्ता कर भरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. संस्था शैक्षणिक असो किंवा व्यावसायिक, कायदा सर्वांना समान आहे. शहराच्या विकासकामांसाठी नागरिकांनी नियमित कर भरावा, थकबाकीदारांची मनमानी आता सहन केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रभाग समिती पाच अधिकारी सय्यद चिवणे यांनी दिली.

पालकांमध्ये चर्चेचा विषय
एकीकडे विद्यार्थ्यांना शिस्त आणि कायद्याचे धडे देणाऱ्या शैक्षणिक संस्थाच जेव्हा नियम धाब्यावर बसवतात, तेव्हा त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल, असा प्रश्न शहरातील पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com