काँक्रीटीकरणामुळे भीषण कोंडी

काँक्रीटीकरणामुळे भीषण कोंडी

Published on

उरण, ता. ३१ (वार्ताहर) : खोपटा परिसरातील मुख्य रस्त्याच्या सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे सध्या परिसरात भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून उरण शहर, जेएनपीए, द्रोणागिरी, तसेच औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, नियोजनशून्य पद्धतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

काँक्रीटीकरणाचे काम सुरू करताना पर्यायी रस्त्यांची योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे सकाळी व सायंकाळी कार्यालयीन, शालेय वेळेत तसेच अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. अनेक वेळा वाहतूक पूर्णतः ठप्प होत असून, वाहनचालकांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थी, नोकरदारवर्ग, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाही बसत आहे. रुग्णवाहिकांना वेळेत मार्ग मिळत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. तसेच दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे.

गेले अनेक दिवस ही वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवत आहे. शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळच्या वेळी रस्त्यातच अवजड वाहन बंद पडल्याने मोठ्या वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, रस्ता काम लवकर पूर्ण करावे, पर्यायी मार्गांची निर्मिती करतेवेळी उत्तम रस्ता तयार करावा जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही, तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमावेत. तसेच सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास अवजड वाहतूक बंद ठेवावी. त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी आणि कामगार यांना त्रास होणार नाही. अन्यथा खोपटा रस्त्यावरील ही वाहतूक कोंडी भविष्यात आणखी गंभीर रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंत्रणेच्या अपयशाचा फटका
स्थानिक नागरिकांच्या मते, प्रशासनाने रस्ता काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक व्यवस्थेचा ठोस आराखडा तयार करणे आवश्यक होते. तसेच वाहतूक पोलिस व संबंधित यंत्रणांची योग्य उपस्थिती नसल्याने कोंडी अधिकच वाढत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता नरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद देण्यात आले नाही.

आमचे कर्मचारी सातत्याने त्या मार्गावर वाहतूक कोंडी करण्यासाठी सक्रिय आहेत. मात्र, एकच पूल चालू असल्याने आणि एकच रस्त्यातून वाहन चालत असल्याने वाहने ही स्लो असतात आणि त्यातच एक वाहन बंद पडले होते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
- अतुल दहिफळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उरण वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com