आम्रमोहराने पनवेलकरांचे डोळे सुखावले

आम्रमोहराने पनवेलकरांचे डोळे सुखावले
Published on

पनवेल, ता. १ (बातमीदार) : थंडी आंब्याच्या पिकासाठी पोषक समजली जात असल्याने पनवेल शहरासह परिसरात आंब्याची झाडे मोहोराने बहरली आहेत. हिरव्यागार झाडांवर आलेली कोवळी तांबूस पालवी आणि त्यावर खुललेला पिवळसर आम्रमोहोर सिमेंटच्या जंगलातही निसर्गसौंदर्याची उधळण करताना दिसत आहे. शहरातील रस्त्यांच्या कडेला, सोसायट्यांमध्ये, उद्यानांमध्ये तसेच मोजक्या आमराईत बहरलेल्या या आम्रमोहोरामुळे पनवेलकरांचे डोळ्यांचे पारणे फिटले आहे.

पनवेल शहर व उपनगरांमध्ये आजही अनेक ठिकाणी आंब्याची मोठमोठी, जुनी झाडे आढळतात. गेल्या काही वर्षांपासून वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे आंब्याच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आला आहे. मात्र, यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत अधूनमधून आणि समाधानकारक पाऊस झाल्याने झाडांना पोषक वातावरण मिळाले. परिणामी सर्वच झाडांवर नवी पालवी फुटली असून, आंब्याला मोहोर भरून आला आहे.

डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. सर्वसाधारणपणे मोठ्या आंब्याच्या झाडांना एक वर्षाआड कमी-अधिक प्रमाणात मोहोर येतो. मात्र, यंदा हवामान अनुकूल राहिल्याने काही मोजक्याच नव्हे, तर अनेक झाडांवर चांगल्या प्रमाणात मोहोर दिसून येत आहे. यामुळे यंदा आंबा उत्पादन चांगले होईल, अशी आशा शेतकरी आणि बागायतदार व्यक्त करत आहेत.

शहरातील काही सोसायट्या, सार्वजनिक उद्याने आणि मोकळ्या जागांतील आंब्याची झाडे मोहोरांनी डवरल्याने नागरिकांनाही निसर्गाच्या या रूपाचा आनंद घेता येत आहे. एकूणच, यंदाचा समाधानकारक पाऊस आणि थंडीमुळे पनवेल परिसरात आम्रमोहोराने बहरलेली झाडे केवळ सौंदर्य वाढवत नसून, येणाऱ्या हंगामात आंब्याचे चांगले उत्पादन होण्याची आशा पल्लवित करत आहेत.

मधमाश्यांसाठी भोजनाची नैसर्गिक व्यवस्था
मागील वर्षांच्या तुलनेत यंदा गावरान आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात बहरली असून, त्यामुळे मधमाश्यांसाठी नैसर्गिक भोजनाची मुबलक व्यवस्था झाली आहे. आंब्याच्या मोहोरावर गुंजारव करणाऱ्या मधमाश्या पर्यावरणीय समतोलासाठी उपयुक्त ठरत असून, परागीभवन प्रक्रियेलाही चालना मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com