निवडणूक प्रचारात पालिका कर्मचाऱ्यांचा सहभाग

निवडणूक प्रचारात पालिका कर्मचाऱ्यांचा सहभाग

Published on

भिवंडी, ता. २ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या निवडणूक विभागामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, संबंधित कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या तक्रारींसोबत छायाचित्रेही सादर केली आहेत. त्याच्या आधारे निवडणूक विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे.

नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये माध्यमिक शिक्षण विभागातील शिपाई साईनाथ भोईर, सार्वजनिक आरोग्य विभागातील सफाई कामगार भगवान साळवी व जितू परमार, तसेच महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक १ अंतर्गत शौचालय कॅबिन क्र. २७-अ येथील सफाई कामगार महेश गोहिल यांचा समावेश आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कोणत्याही शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षाच्या प्रचारात सहभागी होता येत नाही. असे असताना संबंधित चार कर्मचाऱ्यांनी या नियमांचे उल्लंघन करून निवडणूक प्रचारात सहभाग घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कृत्यामुळे कार्यालयीन शिस्तीचा भंग झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

२४ तासांत खुलासा मागितला
भिवंडी महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त विक्रम दराडे यांनी संबंधित चार कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. विभागीय चौकशी करून पालिका सेवेतून निलंबनाची कारवाई का करू नये, याबाबत २४ तासांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वेळेत समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

याआधीही प्रकार
विशेष म्हणजे, मागील महापालिका निवडणुकीदरम्यानही काही कर्मचाऱ्यांनी उमेदवारांच्या प्रचारात सहभाग घेतल्याचे प्रकार समोर आले होते. त्यावेळी केवळ नोटीस देऊन पुढील कोणतीही कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com