महापौर-उपमहापौरसाठी 
भाजप-शिवसेना आमनेसामने

महापौर-उपमहापौरसाठी भाजप-शिवसेना आमनेसामने

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : नवी मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करून उमेदवारी अर्ज रविवारी (ता. १) दाखल केल्याने शहरातील राजकारण तापले आहे.

भाजपतर्फे महापौरपदासाठी नगरसेविका सुजाता पाटील, तर उपमहापौरपदासाठी नगरसेवक दशरथ भगत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोघांनीही भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नवी मुंबई महापालिका मुख्यालयात जाऊन आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी भाजपच्या नगरसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शिवसेना शिंदे गटातर्फेही महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार उभे करण्यात आले आहेत. शिवसेनेकडून महापौरपदासाठी नगरसेविका सरोज पाटील, तर उपमहापौरपदासाठी नगरसेवक आकाश मढवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी या उमेदवारीमागे पक्ष संघटन मजबूत करण्याचा दावा केला आहे.

नवी मुंबई महापालिकेत १११ जागांपैकी ६५ जागांवर भाजप, तर शिवसेना शिंदे गटाचे ४२ नगरसेवक निवडणूक आले आहेत. एका अपक्ष नगरसेवकाने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजपची नगरसेवक संख्या ६६ झाली आहे, तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दोन नगरसेवक जिंकले आहेत. मनसेचा एक नगरसेवक निवडून आला आहे. राज्य पातळीवर भाजप आणि शिवसेना यांची युती असली तरी नवी मुंबई महापालिकेत मात्र दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ औपचारिक न राहता राजकीय प्रतिष्ठेची ठरण्याची शक्यता आहे.

गुरुवारी चित्र स्पष्ट होणार
५ फेब्रुवारीला विशेष सभेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे. अशा परिस्थितीत भाजपकडे जास्त नगरसेवक संख्या असल्यामुळे भाजपचा महापौर बसणार, हे निश्चित मानले जात आहे. तर शिवसेनेकडे कमी नगरसेवक संख्या असल्यामुळे त्यांना शेवटी विरोधी पक्षात बसावे लागणार असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com